पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३७
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

त्याचा नाश करीत. (पु. ११७- १२०) आणि यामुळे बुद्ध व अशोकसुद्धां या बलाढ्य ब्राह्मण खानदानी वर्गाशीं उघड विरोध करण्याचे टाळीत आले असले पाहिजेत. स्वामीजींच्या मतें रजपूत हे कोणी परकीय जमातींचे लोक होते. त्यांना ब्राह्मणांनीं क्षत्रियत्व दिलें. आणि मग या नव्या क्षत्रियांनीं सर्व देश ब्राह्मणांच्या पायाशी गुलामासारखा आणून ठेवला. (पृ. १२८- १२९) अ. बा. लठ्ठे यांच्या मतें ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या दीर्घकालीन संघर्षात शेवटी आठव्या शतकाच्या सुमारास क्षत्रिय रजपूत हे ब्राह्मणांपुढे नमले. तेथून पुढे त्यांच्या अंगीं पराक्रम नव्हता असे नाहीं; पण ते केवळ ब्राह्मणांचे भाडोत्री शिपाई झाले. ध्येयनिष्ठा, उदात्तता यांचा त्यांच्या ठायीं लोप होऊन ते केवळ ब्राह्मणांचें एक हत्यार बनून राहिले. (शाहू छत्रपति चरित्र, खंड १ ला, पृ. १६८).

क्षत्रियांचे चित्र.

 जातिभेदनिर्मितीची ब्राह्मणेतर पंडितांनी केलेली मीमांसा पाहिली म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होते. रजपूत, प्रमार, प्रतिहार, चालुक्य, चव्हाण हे सर्व क्षत्रियवंश व बुद्धकाळांतील इतर राजवंश या सर्वांनी जाणूनबुजून जातिभेद प्रस्थापित करण्याचे व तो दृढमूल करण्याचे कार्य केले आहे, हे या सर्व पंडितांना मान्य आहे; पण क्षत्रियांनी ही कृत्ये ब्राह्मणांच्या प्रेरणेने केली असे त्यांचे मत आहे. विषमतेच्या धर्मामुळे अखिल हिंदु समाजाचा नाश होईल, राष्ट्र रसातळाला जाईल हे त्या सर्वांना दिसत होते. पण कोणीं दयाबुद्धीनें, कोणी भीतीनें, कोणी अन्य कांहीं थोर वां हीन हेतूने त्या धर्माच्या प्रस्थापनेसाठी तरवार उपसली. बाह्मणांनी आमच्यांत दुही माजवली आणि आम्ही भोळेभाबडे असल्यामुळे आपसांत लढलों, या भूमिकेप्रमाणेच जातिभेदधर्मप्रस्थापनाच्या समर्थनार्थ अंगिकारलेली ही दुसरी भूमिकाहि क्षत्रियांना अपमानकारक व अनर्थावह आहे. प्राचीन काळच्या क्षत्रियांना एका जबाबदारीतून मुक्त करतांना हे पंडित त्यांच्यावर दुसरे वाटेल ते आरोप करीत आहेत. भाडोत्रीपणा, कमालीचा अविवेक,
 भा. लो.... २२