पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३६
भारतीय लोकसत्ता

म्हणून शंकराचार्य अबूचे प्रमार क्षत्रिय राजे यांच्याकडे गेला. व माझा हा धर्म तुम्ही प्रस्थापित करा अशी त्यानें प्रार्थना केली. क्षत्रिय हे जात्याच उदार. त्यांचें अंतःकरण फुलासारखे नाजुक. त्यामुळे या ब्राह्मणाची दया येऊन त्यांनी त्याचा धर्म प्रस्थापित करण्याचे मान्य केले. मग त्यांनी प्रतिहार, चालुक्य, चव्हाण यांना नव्या हिंदुधर्माच्या प्रसाराची कल्पना सांगितली. त्यांना हे मान्य नव्हते. पण प्रमार फार मोठे असल्यामुळे त्यांना विरोध करण्याची हिंमत कोणाला झाली नाहीं. मग त्यांनी बौद्धधर्मीयांचा पाडाव करून त्या धर्माचा धुव्वा उडविला. हा जो नवा हिंदुधर्म त्यानेंच हिंदुस्थानचा नाश झाला. याच्या प्रसाराचा पहिला आशीर्वाद प्रमार, प्रतीहार, चालुक्य, चव्हाण आदि क्षत्रिय कुलोत्पन्न राजांनी दिला होता. हें सांगून देशमुख म्हणतात 'ही गोष्ट क्षत्रियांच्या उदारतेची व धर्मस्थापक वृत्तीची साक्ष पटवीत आहे. क्षत्रिय वृत्ति व क्षात्र तेज आणि ब्राह्मणी वृत्ति व भिक्षुकी भावना यांतील महदंतर तिच्यावरून दृष्टोत्पत्तीस येतें.' (क्षत्रियांचा इतिहास खंड १ ला. पृ. १०२ - १०७)
 स्वामी धर्मतीर्थजी यांनी अशाच प्रकारची मीमांसा केली आहे. आर्य धर्मांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीं ब्राह्मणांनी आपली निराळी जात केली व नंतर सर्वच समाजांत त्यांनी उच्चनीचता रूढ केली. या कामीं कांहीं क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांना साह्य केले हें स्वामींना मान्य आहे. (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ४५-४६) पुढें बौद्धधर्मानें समतेचा पुकारा केला. त्यावेळी ब्राह्मण त्या धर्मात शिरले व त्यांनी तेथेंहि जातिभेद रूढ करून त्या धर्माचा विनाश घडवून आणला. या ठिकाण अशी शंका येईल की बौद्ध धर्मगुरु व बौद्ध धर्मीय राजे या वेळी काय करीत होते ? स्वामीजींचे उत्तर असें की त्यांनीं उदारपणाने ब्राह्मणांच्या या जातिभेदाकडे दुर्लक्ष केले. (पृ. १२७) एके ठिकाणी तर स्वामीजींनी असें म्हटले आहे कीं स्वतः गौतमबुद्ध ब्राह्मणांचा पक्षपात करीत असे. तो त्यांच्याबद्दलच्या आदरानें नव्हे तर भीतीनें ! (पृ. १०२) त्यांच्यामते त्या काळच्या सर्व राजांना ब्राह्मणांची दहशत वाटे. (पृ. १०६) जो राजा ब्राह्मणधर्माचा पुरस्कार करणार नाही त्याच्या राज्यावर ब्राह्मण संकटे आणीत. बौद्ध राजा गादीवर आला की त्याच्यावर परचक्र आणून ब्राह्मण