पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३५
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

ब्राह्मणांच्या आग्रहाला बळी पडून कृष्णाने अर्जुनाला सांगितली काय ? सर्व अनर्थाला कारण ब्राह्मण झाले, आपल्यावर मुळींच जबाबदारी नाही, अशी भूमिका ब्राह्मणेतरांना घ्यावयाची आहे, पण ती घेतांना आपण दुसरे काय पत्करीत आहोत याचा ते विचार करीत नाहींत असे वाटतें. क्षत्रियाला स्वतःची बुद्धि नाहीं, निश्चय नाहीं, अवलोक नाहीं ही बैठक ते पत्करीत आहेत. ब्राह्मण म्हणाले, लढा– लढले. ते म्हणाले, राणीला हाकलून द्या- दिली. मुलाला वनवासांत पाठवा-- पाठविला. असें म्हणण्यांत क्षत्रियांची केवढी मानहानि आहे ! आणि नुसती मानहानि नाहीं. क्षत्रियांच्या थोर चारित्र्यावर याने बोळा फिरविला जातो. रामचंद्राने अत्यंत उदात्त ध्येयानें सीतेचा त्याग केला होता. अशाच उदात्त धर्मकल्पनेने तो पित्राज्ञा मानून वनवासांत गेला होता. आणि रामाचें रामत्व सर्व यांत आहे. त्याच्या व्यावहारिक युक्तायुक्ततेबद्दल कितीहि मतभेद असला तरी त्याची भव्योदात्त ध्येयनिष्ठा ही अमान्य करतां येणार नाही. पण ब्राह्मणांच्या जुलमामुळे दशरथानें त्याला हाकलले व तो गेला, आणि सीतेलाहि त्यानें ब्राह्मणांच्या जुलमामुळे दूर केले असा त्याच्या कृत्याचा अर्थ बसविला तर त्यांत ब्राह्मणांवर भडिमार करण्याचे श्रेय जरी मिळाले तरी रामचंद्राला व एकंदर क्षत्रियवर्गाला आपण कोणत्या पातळीवर आणून ठेवीत आहोत याचा विचार ब्राह्मणेतर पंडितांनी केला पाहिजे.

जातिभेद निर्माण केले

 ब्राह्मणांनी जातीभेद निर्माण केले, समानांत उच्चनीचता प्रसृत केली आणि हिंदुसमाजांत पराकाष्ठेची विषमता रूढ केली हा दुसरा अनर्थ होय. ब्राह्मणांच्या माथीं हें जातिभेदाचें अपश्रेय ठेवतांनाहि ब्राह्मणेतर पंडितांनीं वरील प्रकारच्या कोटिक्रमाचाच अवलंब केला आहे. आणि त्यामुळे क्षत्रिय राजवंशाची वरीलप्रमाणेच विचित्र अवस्था होत आहे. काशीराव देशमुख यांनीं क्षत्रियांच्या इतिहासांत जातिभेद निर्मितीचें पुढीलप्रमाणे वर्णन केलें आहे. जातिभेदाचा विषम धर्म शंकराचार्याने निर्माण केला. त्यापूर्वी वैदिक धर्म व आर्य धर्म हे समतेचे धर्म होते; पण आपले वर्चस्व त्यांत प्रस्थापित होत नाहीं म्हणून ब्राह्मणांनीं जातिभेदाचा धर्म केला. त्याला राजाश्रय पाहिजे