पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३४
भारतीय लोकसत्ता

पुढे त्याचा नातू अशोक हा बौद्धधर्माचा पुरस्कार करू लागला तेव्हां ब्राह्मणांनी पुष्यमित्राकडून त्याच्या वंशाचा नाश करविला. प्रा. आण्णा बाबाजी लठ्ठे यांचे याचप्रकारचे मत आहे. सातारा व कोल्हापूर या भोसल्यांच्या दोन शाखांत वैर धुमसत ठेवण्याचे कार्य पेशव्यांनी केले. येवढी मोठी दुफळी घडवून आणण्यापासून पुण्याला १९२० सालीं भवानी पेठेंत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी घेतलेल्या सभेंत व पुणे म्युनिसिपालिटीत १९२५ साली महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी भरलेल्या सभेंत ब्राह्मणेतरांत फूट पाडून कलागत लावून देण्याच्या लहान फाटाफुटीपर्यंत आणि वेद कालापासून तहत आजपर्यंत ब्राह्मण हा क्षत्रियांत फूट पाडून त्यांचा नाश घडवीत आहे असें ब्राह्मणेतर पक्षाच्या पंडितांचं मत आहे.
 ब्राह्मणेतर पक्षानें ही जी भूमिका स्वीकारली आहे तिचा नव्या तरुण ब्राह्मणेतरांनी शांतपणे विवेकाने विचार करावा अशी माझी त्यांना विनंति आहे. या भूमिकेमुळे ब्राह्मणांवर किती अन्याय होतो किंवा ऐतिहासिक सत्याचा किती अपलाप होतो या दृष्टीने विचार करावा असे माझे सांगणे नाहीं, विचार अशा दृष्टीने करावा कीं, ही भूमिका पत्करली तर हिंदुस्थानांत अत्यंत पराक्रमी, धीमान्, प्रज्ञावंत, असा जो क्षत्रियवर्ग व श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, चंद्रगुप्त, शिवछत्रपति यांसारखे जे त्यांतून निर्माण झालेले भारताचे महापुरुष त्यांच्याविषयी काय अभिप्राय प्रगट होतो ? ब्राह्मणांवर निंदेचा भडिमार करतांना या ब्राह्मणेतर लेखकांनीं क्षत्रिय व एकंदर ब्राह्मणेतर जनता यांना कोणच्या पातळीवर आणून सोडलें आहे याचा विचार ब्राह्मणेतर तरुणांनी करावा. कौरव, पांडव, श्रीकृष्ण, रामचंद्र, चंद्रगुप्त, हे महापुरुष दुसऱ्याने ज्यांना सहज फसवावें, भरीं घालावें, चिथावून द्यावें, आणि हा आपणांस फसवीत आहे हे ज्यांना कळू नये असे होते काय ? ब्राह्मणांनीं चिथावल्यामुळे कौरवपांडवांचें युद्ध जुंपले असते तर ते थांबविण्याची संधि शेवटी आली होती. अर्जुन 'मी लढत नाहीं' असे म्हणत होता. त्यावेळी श्रीकृष्णाला तो अनर्थ सहज टाळता आला असता. का श्रीकृष्णालाहि ब्राह्मणांचे कारस्थान कळण्याइतकी बुद्धि नव्हती ? आणि त्यानें गीता सांगितली ती स्वतःच्या प्रेरणेनें नव्हे काय ? तिच्यामुळे शेवटीं लढाईची प्रेरणा मिळाली. तेव्हां तीहि स्वतःच्या मनांत नसतांना