पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३३
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

ब्राह्मणेतर यांच्याबद्दल जो अभिप्राय प्रगट होतो त्याच्याकडे मला वाचकांचे लक्ष वेधावयाचे आहे.

क्षत्रियांत दुही माजविली

 या सर्व ब्राह्मणेतर पंडितांच्या मतें आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठीं ब्राह्मणांनी जे अनर्थ घडवून आणले त्यांतील पहिला मोठा अनर्थ हा की ब्राह्मणांनीं क्षत्रियाक्षत्रियांत प्रत्येक वेळी दुही माजविली व त्यांच्यांत आपसांत युद्धे घडवून आणून अखिल क्षत्रिय समाजाचा नाश करून टाकला. राम-रावण, कंस-कृष्ण, कौरव-पांडव हे सर्व ज्योतिबा फुले यांच्या मतें देवभोळे क्षेत्रपति होते. ब्राह्मणांनीं त्यांच्यांत तंटे माजवून त्यांचा नाश केला. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांचा असाच आरोप आहे. त्यांच्या मतें ब्राह्मणांनी कौरवपांडवांपासून आजच्या काँग्रेसच्या संघटनेपर्यंत हेच धोरण कायम ठेविले आहे. कौरवपांडवांत युद्ध घडवून त्यांचा नाश ब्राह्मणांनी केला; दशरथ व रामचंद्र यांच्यांत वितुष्ट आणून रामाला देण्यास दशरथास भाग पाडलें; इतकेच नव्हे तर पुढे सीतेशी घटस्फोट घेणे ब्राह्मणांनींच रामाला भाग पाडिलें. सीता जनकाची मुलगी आणि जनक ब्राह्मणविरोधी ! म्हणून त्यांनी हा सूड घेतला. स्वामी म्हणतात, 'अगोदरच ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे रामाचे जीवित उत्सन्न झालेले होते. म्हणून त्यांच्याशीं पुन्हां विरोध नको या बुद्धीनें रामानें आपल्या मनाविरुद्ध सीतेचा बळी दिला.' (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ६१-६७) बौद्ध धर्मातहि ब्राह्मणांनीच फूट पाडली. ब्राह्मण स्वत: बौद्धधर्मांत शिरले व सूक्ष्म कारस्थानें करून, आपल्या दुष्ट बुद्धिसामर्थ्याचा उपयोग करून, ब्राह्मणांनीं तो धर्म रसातळास नेला. कारण, स्वामींच्या मतें, तो धर्म समतावादी असून खऱ्या अर्थाने राष्ट्रीयधर्म होता. (पृ. ८१ ते ८७) बुद्धधर्माचे हिंदुस्थानावर चवदाशे वर्षे वर्चस्व होते असेहि स्वामींचें मत आहेच. क्षत्रियांत फूट पाडून त्यांचा नाश घडविणे हें व्रत ब्राह्मणांनी पुढेहि चालविले होतें. कौटिल्य नांवाच्या ब्राह्मणानें चंद्रगुप्ताकरवीं शिकंदराला बोलाविले. मगधाचा त्याला नाश करावयाचा होता. पण शिकंदर परत गेला. तेव्हां त्यानें चंद्रगुप्ताकरवीं नंदकुलाचा नाश करविला.