पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३२
भारतीय लोकसत्ता

बनविलें व क्षत्रियांवर भिक्षुकी श्रेष्ठत्वाचा बोळा फिरवून व जातीभेद उत्पन्न करून हिंदी राष्ट्र रसातळास नेले.' असा अभिप्राय काशीराव देशमुख यांनी दिला आहे. (क्षत्रियांचा इतिहास, खंड १ ला, पृ. २४८- २५०) 'वास्तविक पाहिले तर मनाचा उदारपणा आजपर्यंत ब्राह्मणांनी कधींहि कोठेंहि दाखविलेला नाहीं. संकुचित वृत्ति हेच त्यांचें ब्रीद. उदार वृत्ति व मनाचा मोकळेपणा हा क्षत्रियांचाच मनोधर्म.' (संस्कृतींचा संग्राम- ठाकरे पृ. ३६.) 'सामान्य नियमाला अपवाद असतात हे तत्त्व लक्षांत ठेवून अर्से म्हणावयास हरकत नाहीं कीं, ब्राह्मण- मग तो चित्पावन असो, यजुर्वेदी असो किंवा कोणीहि असो, त्याच्या आपमतलबाला किंचित् धक्का लागण्याची वेळ आली कीं तो सर्व देशबंधुत्वाचे नाते विसरून ब्राह्मणेतरांवर सापाप्रमाणे उलटण्यास कमी करणार नाही' (कोदंडाचे टणत्कार - पृ. १३७.) अशा तऱ्हेचीं श्री. ठाकरे यांची मतें सुप्रसिद्धच आहेत. स्वामी धर्मतीर्थजी महाराज, प्रा. लठ्ठे, डॉ. आंबेडकर यांनी याच तऱ्हेचीं मतें मांडलेली आहेत.
 वरील अवतरणे ब्राह्मणेतर ब्राह्मणांची भयंकर निंदा करतात अशी तक्रार करण्यासाठी दिलेली नाहींत. तशी तक्रार करण्याचा, किंवा या विधानाबद्दल संताप येण्याचा अधिकार ब्राह्मणांना मुळींच नाहीं. याच पापानें त्यांचेहि हात धुतलेले आहेत. 'कलियुगांत क्षत्रियच नाहींत, फक्त ब्राह्मण व शूद्रच आहेत' हें मत ब्राह्मण शेकडो वर्षे कवटाळून बसले होते. अनेक थोर क्षत्रिय वंश भारताच्या रक्षणाचें व प्रजापालनाचें कार्य करीत असल्याचें डोळ्यास दिसत असूनहि त्या सर्वांना शूद्र लेखणाऱ्या ब्राह्मणांच्या ठायीं समाजहितदृष्टि कितपत असेल ते दिसतंच आहे. अर्वाचीन काळांतहि राजवाड्यांच्या सारख्या पंडिताला एकाद्या सामान्य चिटोऱ्याच्या आधारे सर्व कायस्थ प्रभूंची निंदा करण्यास दिक्कत वाटत नाहीं. तेव्हां दुसऱ्या सर्व जातींबद्दल अत्यंत हीन उद्गार काढणे हे आपल्या सर्वसमाजाच्या पिंडांतच आहे. ब्राह्मणांना तर याविषयीं राग येऊं देण्याचा काडीमात्र अधिकार नाहीं. यामुळे त्या हेतूनें हीं अवतरणें दिलेलींच नाहींत. यांत ब्राह्मणांविषयीं प्रगट केलेलीं मतें व पुढे दिलेला तपशील यांतून क्षत्रिय, वैश्य व इतर