पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३१
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

स्वराज्य' या त्यांच्या पुस्तकांत त्यांनीं ब्राह्मणब्राह्मणेतर या विषयाबद्दल आपले विचार आपल्या अत्यंत सडेतोड पद्धतीने सांगितलेले आहेत. ब्राह्मणेतरांची भूमिका विशद करण्यासाठी आधारभूत म्हणून घेतलेले मुख्य असे हे ग्रंथ आहेत. यांतील ठाकरे यांची पुस्तकें जरा निराळ्या कोटीतील आहेत. त्यांची विचारसरणी इतरांच्यापेक्षां जरा जास्त व्यापक, थोडी जास्त उदार व इतरांच्याबरोबर स्वतःच्या दोषांचीहि कसून तपासणी करणारी अशी आहे. वरील इतर ग्रंथांविषयीं पुढें जी विधानें केली आहेत तीं कोठें कोठें त्यांच्या पुस्तकांना लागू पडणार नाहींत.

ब्राह्मणांचें चित्र

 या सर्व ग्रंथांवरून ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका पाहूं लागतांच या थोर पंडितांच्या मनांत अगदीं अग्रभागी असलेला जो पहिला सिद्धान्त आपणांस दिसून येतो तो हा की, वेदकालापासून आज १९५४ सालपर्यंत गेल्या सहासात हजार वर्षांच्या काळांत हिंदुस्थानावर जेवढे अनर्थ कोसळले, ज्या आपत्ति ओढवल्या, विनाशाचे ने प्रसंग गुदरले, येथें धार्मिक, सामाजिक, राजकीय- कोणच्याहि क्षेत्रांत जी अवनति झाली त्या सर्वाला येथले ब्राह्मण कारणीभूत आहेत. या लेखकांत कांहीं मतभेद आहेत. कांही विरोधी मतें यांनी सांगितली आहेत; पण ब्राह्मण हा दुष्ट, कारस्थानी, स्वार्थी, अधम, नीच, स्वजनद्रोही, स्वदेशद्रोही, धर्महीन, ध्येयहीन, तत्त्वशून्य, केवळ संधिसाधू, हृदयशून्य असा आहे- हजारों वर्षे असा आहे आणि अजूनहि त्याच्यांत फरक झालेला नाहीं, याबद्दल कोणाच्याहि मनांत शंका नाहीं. याबद्दल त्यांच्यांत मतभेद नाहीं. 'आज तीन हजार वर्षे भटांचे राज्य चालू आहे. त्यांत शूद्र व अतिशूद्र यांचे हाल होत आहेत. भट लोकांनी येथल्या लोकांना ज्ञानहीन केलें, स्वतः खोटे ग्रंथ लिहून शूद्रांस फसविले.' अशीं महात्मा फुले यांचीं मतें आहेत. (गुलामगिरी- प्रस्तावना) 'प्रारंभीच्या आर्यकाळापासून तहत आजपर्यंत भिक्षुकशाहीनें स्वतःच्या फाजील वर्चस्वाकरितां व स्वार्थाकरितां क्षत्रियांशीं व देशाशी निमकहरामी केली व द्वेषबुद्धीची विषारी कारस्थानें केलीं.', 'शंकराचार्यानें भेदप्रधान भिक्षुकी हिंदुधर्माच्या नांवाखालीं आखिल ब्राह्मणेतर जनतेला ब्राह्मणांचे गुलाम