पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३०
भारतीय लोकसत्ता

झाली, तेव्हां या वादाच्या ज्वाळा खूपच भडकल्या. मद्रासमध्ये साधारण याच कालखंडांत हा वाद उद्भवला व पोसला आहे. डॉ. नायर यांच्या ब्राह्मणेतर पक्षांचें नांव जस्टिसपार्टी असे होते. माँटेग्युचेम्सफर्ड यांनी राजकीय सुधारणांचा नवा हप्ता देऊं करतांच महाराष्ट्रांत ह्या वादाला उग्र रूप आले; त्याचप्रमाणे मद्रास प्रांतांतहि त्याच वेळी व त्याच कारणानें यानें उग्ररूप धारण केले. या पाऊणशे वर्षांच्या काळांत अनेक ब्राह्मणेतर पंडितांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या पुस्तकांतून आपली भूमिका विशद केली आहे. या वादाचें विवेचन करण्यासाठी त्या पुस्तकांतून ती त्यांची भूमिका समजावून घेणे अगत्याचें आहे. ज्योतिबा फुले यांनी 'गुलामगिरी' या आपल्या पुस्तकांत आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली आहे. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांचा 'दि मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम' या नांवाचा ग्रंथ याच हेतूनें लिहिलेला आहे. स्वामी मूळचे मलबारचे मोठे कार्यकर्ते होते. पुढे लाहोरच्या हिंदु मिशनरी सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी आपला ग्रंथ १९४१ साली प्रसिद्ध केला. महात्मा फुले यांच्या व स्वामींच्या मतांत पुष्कळसे साम्य आहे. फरक एवढाच की, फुले यांनी नुसतीं विधानें केलीं आहेत, मतें मांडली आहेत तर स्वामींनी अर्वाचीन पांडित्याच्या सर्व साधनांनी आपला ग्रंथ भूषविला आहे. प्रा. अण्णा बाबाजी लठ्ठे यांनी कोल्हापूरचे राजर्षि शाहू छत्रपति यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांत त्यांनी या वादाची सांगोपांग चर्चा केली आहे. छत्रपति शाहू ब्राह्मणेतर चळवळीचे अध्वर्यु असल्यामुळे हा ग्रंथ प्रमाणभूत मानण्यास हरकत नाहीं. 'ब्रिटिश साम्राज्याचा उदय' हें लठ्ठे यांचे दुसरे छोटेसें पुस्तक आहे, त्यावरूनहि ब्राह्मणेतरांच्या भूमिकेची कल्पना येते. नागपूरचे काशीराव बापूजी देशमुख यांनीं 'क्षत्रियांचा इतिहास' या ग्रंथाच्या तीन खंडांत ऐतिहासिक व तात्त्विक चर्चा करून ब्राह्मणेतर पक्षांचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. डॉ. आंबडेकर यांनी 'हू वेअर दि शूद्राज' हा ग्रंथ अलीकडेच लिहिला आहे. त्यांत एका क्षत्रिय शाखेच्या ऱ्हासाचीच मीमांसा असल्याने त्यांतूनहि या विषयावर बराच प्रकाश पडतो. श्री. रा. केशव सीताराम ठाकरे- प्रबोधनकार हे थोर लेखक व संपादक महाराष्ट्रांत विश्रुत आहेत. 'कोदण्डाचे टणत्कार,' 'संस्कृतीचा संग्राम' व 'शेतकऱ्यांचें