पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२९
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

आपल्या समाजांत राजकीय व आर्थिक कारणांनी निर्माण झालेल्या भेदांचा व विघटनेच्या कारणांचा विचार आपण गेल्या दोन लेखांत केला आहे. आतां सामाजिक व धार्मिक कारणांनी निर्माण झालेल्या विघटनेचा विचार करावयाचा आहे.

तीन भेद

 ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य व हिंदुमुसलमान हे प्रमुख भेद या क्षेत्रांत येतात. या भेदांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न या भूमींत अखंड चालू आहेत. ते यशस्वी होत आहेत, पुष्कळ अंशी झाले आहेत असे कधीं कधीं वाटते. पण कधीं असे प्रसंग, अशा घटना घडतात की या भेदभावनांना पहिल्यापेक्षांहि उग्र रूप येत आहे की काय अशी शंका येऊं लागते. म्हणूनच यांचा फार खोलवर विचार करणे अवश्य आहे. या भेदांतून निर्माण होणारा दूरीभाव, तज्जन्य कटुता व त्यांतून कधीं कधीं निर्माण होणारे कलह हे नाहींसे झाल्यावांचून भारतीय समाज एकसंघ व अभंग होणार नाहीं. आणि तसें झाल्यावांचून भारताची लोकसत्ता यशस्वी होण्याची आशा धरतां येणार नाहीं.
 वर उल्लेखिलेल्या तीन भेदांपैकीं, ब्राह्मणब्राह्मणेतर या भेदाचा विचार प्रथम करावयाचा आहे. नर्मदेच्या दक्षिणेस ब्राह्मण ब्राह्मणेतरवादानें निर्माण झालेली कटुता मध्यंतरी अगदी विकोपाला गेली होती. आणि आजही हा वाद शमल्यासारखा दिसत असला तरी उभय पक्षीयांच्या मनांतील परस्पराविषयींचे दंश कमी झाले आहेत, असे म्हणण्यास फारशी जागा आहे, असें वाटत नाहीं. तेव्हां ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यांतील या भेदाचीं मूलकारणे तपासून त्यांचे निर्मूलन करून त्यांच्यांत समभूमि निर्माण होण्याची शक्यता कितपत आहे हे पाहिले पाहिजे.
 महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यापासून म्हणजे म्हणजे जवळजवळ गेलीं पाऊणशे वर्षे महाराष्ट्रांत हा वाद धुमसत आहे. कोल्हापुरास शाहू छत्रपति यांना अधिकारसूत्रे प्राप्त झाल्यापासून म्हणजे या शतकाच्या आरंभापासून या वादाला जास्तच तीव्रता येऊं लागली. आणि १९२० सालीं ब्राह्मणेतरांची प्रत्यक्ष चळवळ सुरूं