पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२८
भारतीय लोकसत्ता

तरी आपण सर्व मिळून एक समाज आहे अशी भावना त्या सर्वांच्या मनांत नांदत असली पाहिजे. धर्म, वर्ण, जाति, पंथ, प्रांत इ. अनेक कारणांनी प्रत्येक समाजांत अनेक भिन्न गट झालेले असतात. ऐतिहासिक कालांत त्यांच्यांत उच्चनीच, जित-जेते अशा प्रकारच्या भेदांनीं शत्रुत्व निर्माण झालेले असते. अनेक कारणांनी निर्माण झालेल्या व पोसलेल्या या भेदभावना समूळ नष्ट करून समाजाच्या सर्व घटकांत आपण सर्व एकाच समाजवृक्षाच्या भिन्न शाखा आहों, आपण सर्व एकच आहों अशी भावना दृढमूल करण्यांत समाजाच्या नेत्यांना ज्या मानानें यश येईल त्या मानाने लोकसत्ता यशस्वी होईल. संस्कृतीचा प्रसार, शिक्षण, राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रांतील समता, सम आकांक्षा, सम ध्येयभावना इ. अनेक बंधनांनी भिन्न समाज एकरूप होतात. पण पुष्कळ वेळां हीं सर्व ऐक्यकारणे असूनहि 'आम्ही भिन्नच आहों' असा आग्रह भिन्न गटांत टिकून राहतो. तसें झाल्यास हे आग्रह लोकशाहीला मारक होतील. म्हणून समाजाच्या भिन्न घटकांतील भेदभावना नष्ट करून त्यांचे भिन्न अहंकार एकरूप करून टाकणें लोकसत्तेला अत्यंत अवश्य आहे. दृढ व अभंग ऐक्य हा लोकसत्तेचा पाया आहे. कोणच्याहि देशांत अशा ऐक्यावांचून लोकसत्ता यशस्वी झालेली नाहीं व होणार नाहीं.
 या दृष्टीनें भारतीय समाजांतील भिन्न घटकांचा आतां विचार करावयाचा आहे. पाश्चात्यांचे राज्य या भूमींत येण्यापूर्वी हा समाज अनंत भेदभावनांनीं छिन्नभिन्न झालेला होता. आणि अत्यंत दुःखाची गोष्ट ही कीं, तसा तो रहावा हेंच तत्त्वज्ञान या समाजाने शेकडों वर्षे अंगीकृत केले होते. पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होऊं लागतांच येथील समाज-धुरीणांना याची जाणीव होऊन प्रथम ते घातक तत्त्वज्ञान नष्ट करण्याचा उद्योग त्यांनी हातीं घेतला. त्यांच्या त्या प्रयत्नांचें गेल्या अनेक प्रकरणांतून विवेचन केले आहे. आतां गेलीं शंभर सवारों वर्षे चालू असलेल्या या प्रयत्नांच्या यशाचं मापन व मीमांसा करावयाची आहे. त्या प्रयत्नांचें एक महान् फल म्हणजे स्वातंत्र्य है आपल्या पदरांत पडलें आहे. पण त्यांच्या साह्यानें आपला समाज एकसंध, एकजीव व अभंग करून येथील लोकसत्ता यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपली किती प्रगति झाली आहे त्याचा विचार झाला पाहिजे.