पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२६
भारतीय लोकसत्ता

सर्वस्वी अलिप्त असलेल्या क्रीडेच्या क्षेत्रांत किती राजकारण चालतें, कर्णधाराच्या जागा कशा विकल्या जातात इकडीह त्यांनी नजर टाकावी. युनिव्हर्सिट्या, खाजगी शिक्षणसंस्था, परीक्षामंडळे, बोर्डे येथें किती अंदाधुंदी आहे, किती फूट व विघटना आहे, विद्यार्थ्यांच्या कल्याणाविषयीं किती काळजी आहे, हेंहि त्यांनी तपासून पहावें. शेवटीं या तरुण मित्रांनीं स्वतःकडेहि आरशांतून पहाण्याचा प्रयत्न करावा. कॉलेजमध्ये वसतिगृहे, सफरी, संमेलने यांच्या चिटणीशीच्या महान् पदावर आरूढ झालेले विद्यार्थी, भांडवलदार, कारखानदार, व्यापारी या वर्गांहून निराळ्या वृत्तींचे आहेत काय, याची मनोमन साक्ष त्यांनी घ्यावी. पैसा हाताळण्याची अगदी अल्पसंधी, कारभार करण्यापुरता अगदीं क्षुद्र अधिकार व निवडून आल्यामुळे मिळालेली अगदी शून्यवत् सत्ता, एवढ्या गोष्टींमुळे, सरस्वतीच्या राज्यांत निष्पाप, निरागस अशा वृत्तीनें जे संचरतात अशी लोकांची समजूत आहे, त्यांची दृष्टि किती फिरते, त्यांच्यांत किती कलह माजतात, पक्ष पडतात व त्यांची नीति कोणत्या हीन पातळीला जाते हें त्यांनी पाहिले, तर काँग्रेसलाच काय पण भांडवलदार कारखानदार व व्यापारी या वर्गांनाहि नांवे ठेवण्याला आपल्याला अधिकार नाही, असे त्यांच्या ध्यानांत येईल.
 याचा अर्थ त्यांनी टीकाच करूं नये असा नाहीं. पण सर्व समाजच भ्रष्ट व अधोगामी झाला आहे, कोणचाहि एक वर्ग या अवकळेंतून मुक्त नाहीं हें सत्य जाणून त्यांनी टीका केली, म्हणजे त्या टीकेला आत्मनिरीक्षणाचें स्वरूप येईल आणि तसे झाले म्हणजे हे त्यांच्या ध्यानांत येईल की, कार्य करावयाचे असले तर आहे त्या संघटनांत काँग्रेस ही संघटनाच सर्वांत जास्त स्वीकरणीय आहे, आणि म्हणून काँग्रेसमध्ये शिरून, तिच्या लोकशाहीच्या प्रयोगांत आत्मीयतेने सहभागी होऊन, या भूमीच्या सर्व अंगांची पुनर्घटना करण्याचा प्रयत्न करणे हेच धोरण शहाणपणाचे व अंतीं कल्याणकारक होईल. काँग्रेस ही या देशांतील एक महान् पुण्याई आहे. आणि सर्व समाज वर सांगितल्याप्रमाणे अनेक रोगांनी ग्रस्त झाला असतांना तसली दुसरी पुण्याई निर्माण करणे अशक्य आहे. वर निर्देशिलेल्या तुलनात्मक दृष्टीने त्यांनी पाहिले तर अशी एक पुण्याई निर्माण करण्यांत