पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२५
औद्योगिक पुनर्घटना

ठेवणारी जनता जोपर्यंत जागृत व समर्थ नाही, तोपर्यंत आहे या स्थितीत कसलाहि बदल घडून येणे शक्य नाहीं.
 हे सर्व विवेचन माझ्या तरुण मित्रांच्यासाठी केलेले आहे. या भरतभूमीचा उत्कर्ष व्हावा, येथील लोकसत्ता यशस्वी व्हावी, या देशांत सर्व क्षेत्रांत समता प्रस्थापित व्हावी अशा आकांक्षा ज्यांच्या मनांत आज घोळत आहेत आणि त्या आकांक्षांच्या सिद्धीसाठी आपले अंग झिजवावे असा ध्येयवाद ज्यांच्या चित्तांत उदित झाला आहे त्यांच्यासाठीं ही मीमांसा केली आहे. त्यांनीं हें ध्यानीं घ्यावें की काँग्रेसने या देशांत लोकसत्तेचा एक महान् प्रयोग, एक अभूतपूर्व असा प्रयोग चालविला आहे. एवढ्या मोठया प्रमाणावर असा प्रयोग जगांत अजून कोणीं कधींहि केलेला नाहीं. तेव्हां यावेळी, आपण कांठावर बसून टीकाकाराची किंवा तटस्थ निरीक्षकाची भूमिका न घेतां, त्या प्रयोगांत सामील व्हावे आणि तो काँग्रेसचा प्रयोग आहे असें न मानतां, आपला- म्हणजे अखिल भरतभूमीनें चालविलेला– प्रयोग आहे अशा बुद्धीने त्यांत सहकार्य करावें. यासाठी काँग्रेसचे दोष दृष्टीआड करावे किंवा तिच्या अधःपाताकडे डोळेझांक करावी, असें मला मुळींच म्हणावयाचें नाहीं. उलट, अत्यंत कठोर बुद्धीनें त्याचें परीक्षण करावें, असेच मला सांगावयाचे आहे. माझा आग्रह एवढाच आहे की, मागल्या एका प्रकरणांत सांगितलेली विघटना काय किंवा आतां वर्णिलेली धनवशता काय, हे दोष, हीं पापें, हे रोग केवळ काँग्रेसचे नाहीत, आपला अखिल समाजच या रोगांनी जर्जर झालेला आहे, या भयंकर सत्याचा त्यांनीं विसर पडू देऊ नये.

अखिल समाजाचा रोग

 काँग्रेसचें सरकार ही संस्था किंवा भांडवलदार वर्ग यावरून दृष्टि काढून अन्य क्षेत्रांत त्यांनीं क्षणभर ती वळवावी, म्हणजे माझ्या म्हणण्याची त्यांना प्रतीति येईल. डॉक्टर व त्यांची इस्पितळे यांत सध्यां किती बेजबाबदारी, उन्मत्तता, हृदयशून्यता व धनोपासना चालू आहे हे त्यांनीं पहावें. वृत्तव्यवसायामध्ये संपादक, वार्ताहर इ. प्रकारचे लोक धनवंतांच्या हातांतील बाहुलीं कशीं झालीं आहेत ते लक्षांत घ्यावें. क्रिकेटेसारख्या राजकाणापासून