पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२४
भारतीय लोकसत्ता

ते सहज लीलेनें शेंकडों खिंडारे पाडतील. जनतेमध्ये राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्यप्रेम, लोकसत्तेवरील अनन्यभक्ति, विवेकशीलता व चारित्र्यसंपन्नता या गुणांची वाढ होऊन तिला धनमोह जेव्हां जिंकता येईल, निदान धनमोहातीत अशा तरुण कार्यकर्त्यांची- राज्यकारभार चालविण्यास, सार्वजनिक व्यवहाराचे सूत्रचालन करण्यास अवश्य तितक्या कार्यकर्त्याची- पुरेशी संख्या जेव्हां या देशांत निर्माण होईल, तेव्हांच भांडवली सत्तेच्या मगरमिठींतून ही भूमि मुक्त होईल. लोकांची भाविकता, अज्ञान, भाबडेपणा हा पोपच्या धर्मसत्तेचा पाया होता. त्याचप्रमाणे धनमोह हा भांडवली सत्तेचा पाया आहे. तो उखडून निघाल्यावांचून हा संग्राम जिंकणे अशक्य आहे.
 जनतेचें बळ, जनताजागृति या सर्वांचा हाच अर्थ आहे. जागृति म्हणजे केवळ हक्काची जाणीव नव्हे. जबाबदारीची जाणीव, आपत्तीची जाणीव, त्या आपत्तीशीं झुंजण्याची सिद्धता, तिचें स्वरूप जाणण्याइतकी विवेकशीलता व वाटेंत येणाऱ्या मोहांना जिंकण्याचे मन:सामर्थ्य- एवढा जागृति या शब्दाचा अर्थ आहे. आणि अशी जागृति झाल्यावांचून औद्योगिक पुनर्घटना, उद्योगधंद्याचें राष्ट्रीयीकरण, आर्थिक क्षेत्रांतील समता या शब्दांना कसलाहि अर्थ नाहीं. स्वातंत्र्य जसे कायद्यानें देतां येत नाहीं, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण कायद्यानें करतां येत नाहीं. राष्ट्रीयीकरण म्हणजे उद्योगधंद्यावरील, अर्थोत्पादनाच्या साधनांवरील राष्ट्राची सत्ता; सरकारची नव्हे. आणि राष्ट्रांतील जनता संघटित, विवेकी व निग्रहानुग्रहसमर्थ नसेल तर राष्ट्रीयीकरण हें कधींहि शक्य होणार नाही. एका वर्गाच्या हातून धनदौलत निघून फार तर दुसऱ्या वर्गाच्या हातीं तीं जाईल. पण तो दुसरा वर्ग पहिल्यासारखाच भांडवलदार होईल, हा विचार आपण विसरून चालणार नाहीं. काँग्रेसमधल्या विघटनेची जी उद्वेगजनक कथा आपण ऐकिली तिच्यावरून भांडवलदार व काँग्रेसजन यांच्यांत मुळांतच कांहीं फरक असतो, ही भ्रामक समजूत आपल्या मनांतून दूर होईल. भांडवलदार हा धनाच्या जोरावर सत्ता काबीज करतो. काँग्रेसचे सभासद सत्तेच्या जोरावर धन जिंकू पहातात. या दोघांवरहि नियंत्रण