पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२३
औद्योगिक पुनर्घटना

केला तरी त्याची कोणी दखल घेत नाहीं. अशा स्थितीत संग्राम पुकारावयाचा तो कोणाच्या बळावर? येथील जनता ही लोकशक्ति निर्माण करण्यास कितपत समर्थ आहे हे आपण मागें पाहिलेच आहे. पस्तीस कोटी लोकांपैकी जवळजवळ सोळा कोटी लोक शतकानुशतकें माणुसकीच्याहि खालच्या तळावर होते. यांच्यांतून भांडवलदारी सामर्थ्याशीं झुंज घेण्यास अवश्य ती लोकशक्ति निर्माण होण्यास अजून फार अवकाश आहे. या पस्तीस कोटी लोकांतून काँग्रेस नांवाचे एक संघटित सामर्थ्य निर्माण झाले आहे, हाच मुळीं जगाच्या इतिहासांतला एक अद्भुत चमत्कार आहे. जुनीं शेकडों वर्षांची परंपरा अगदीं निराळी असतांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच निवडणुकी अगदीं खुल्या ठेवून लोकसभेच्या जागांपैकी जवळजवळ तीनचतुर्थांश जागा जिंकण्याइतका संघटित पक्ष भारतासारख्या विस्तीर्ण देशांत निर्माण होतो, हेंच, तुलनेने पहातां, एक महदाश्चर्य आहे; अशा तुलनेने म्हणजे जगाच्या व्यावहारिक दृष्टीनेंच आपण काँग्रेसच्या यशापयशाकडे पहाण्यास शिकले पाहिजे. आपल्या मनांतल्या आकांक्षांश तोलून पहाण्याची वृत्ति आपण सोडून दिली पाहिजे.

जनशक्तीचें पाठबळ ?

 ती दृष्टि सोडून व्यवहारी, इतिहासप्रणीत, तुलनात्मक दृष्टीने आपण विचार करूं लागलों तर आपल्याला हे कळून येईल कीं, भांडवली सत्तेशीं करावयाचा संग्राम हा अखिल जनतेच्या बळावरच करता येतो. पूर्वी युरोपांत राजसत्तेवर पोपच्या धार्मिक सत्तेचें वर्चस्व असें. तें वर्चस्व झुगारून देण्याचा अनेक राजांनी प्रयत्न केला. पण प्रारंभी त्यांना यश आले नाहीं. त्यांना पुन्हा पुन्हां पोपपुढे शरणागति पत्करावी लागली. कारण त्यांच्या प्रजेच्या मनावर धर्मश्रद्धेचे वर्चस्व होते. विद्येच्या पुनरुज्जीवनाने ते वर्चस्व नष्ट होतांच पोपचें वर्चस्व नष्ट झाले. भांडवली वर्चस्वाचा प्रकार असाच आहे. धनमोहाला जोपर्यंत जनता वश आहे तोपर्यंत कोणचाहि पक्ष सत्ताधारी झाला तरी भांडवलाचे वर्चस्व लवमात्र कमी होणार नाहीं. युरोपांतील राजाप्रमाणे सत्ताधारी पक्षाला पुन्हा पुन्हां भांडवलदारांपुढे शरणागति पत्करावी लागेल. कारण त्यांच्याविरुद्ध उभारलेल्या आघाडीत