पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२२
भारतीय लोकसत्ता

पाकनिष्ठ मुसलमान ही दुसरी विरोधी आघाडी होती. निजामानें तर सार्वभौमत्वाचेच तत्त्व पुकारले होते. याच मुसलमानांच्या मतानें व सामर्थ्यानें पाकिस्तान जन्मास आले होतें. हिंदुस्थानहि गिळंकृत करावयाचें अशा मुसलमानांच्या घोषणा चालू होत्या. तेव्हां या आघाडीवर मुकाबला करावा लागेल हें धरून चालणे अवश्य होतें. पाकिस्तानांत हिंदूंच्या कत्तली सुरू झाल्या होत्या. आणि निर्वासितांची या देशांत लाखांनी आवक सुरू झाली होती. यांत कोठें ठिणगी पडून युद्ध सुरू होते की काय, अशी भीति होती. आणि ती वगळली तरी स्वतंत्रपणेहि निर्वासितांचा प्रश्न युद्धासारखाच कठीण होता. म्हणजे ती एक आणखी आघाडी होती. याशिवाय आणखी प्रश्न रोज उपस्थित होत होते. शिखांना शिखिस्तान हवे होते, द्रविडांना द्रविडीस्थान हवें होतें आणि या सर्वांहून भयंकर म्हणजे महात्माजींचा खून झाला होता व त्यांतून कोणते उत्पात होतात याचा अदमास लागणे शक्य नव्हते. अशा स्थितीत या सर्व आघाड्या संभाळून भांडवलदारांच्या अत्यंत बलाढ्य अशा आघाडीला आव्हान देणे कोणच्या पक्षाला कितपत शक्य झाले असते, याचा भारतीयांनी विचार करणे अवश्य आहे. या सर्व शक्ति, या सर्व आघाडया नीट हाताळल्या गेल्या नसत्या, तर येथें दंगेधोपे, बंडाळ्या, अत्याचार, उत्पात यांना ऊत आला असता. येथें एकच रणधुमाळी माजली असती आणि तींतून अराजक निर्माण होऊन या देशाची शकले शकले झाली असती. हे सर्व जाणून काँग्रेसने, भांडवली शक्तीला प्रारंभीच डिवचावयाचें नाहीं, जरूर तर तिच्यापुढे शरणागतीहि पत्करावयाची, असे ठरविले असले तर, त्यांत बाह्यतः दिसावयाला वचनभंग, कर्तव्यच्युति किंवा तत्त्वभ्रष्टता दिसत असली तरी, तो एक मुत्सद्देगिरीचा डाव होता, असेंच भावी इतिहासकारांना म्हणावे लागेल.
 त्यांतूनहि काँग्रेसची स्वतःची आघाडी बळकट असती, तर झाली यापेक्षा जास्त प्रगति निःसंशय दिसली असती; पण या आघाडीला प्रत्येक प्रांतांत किती खिंडारें पडली आहेत हे मागील प्रकरणांत आपण पाहिलेच आहे. प्रत्येक प्रांतांतील काँग्रेसपक्ष दुही, गटबाजी, अंतःकलह, मत्सर, यांनीं छिन्नभिन्न झालेला आहे. स्थिर शासन एकहि प्रांतांत राहूं शकत नाहीं आणि राजेन्द्रबाबू, नेहरू यांनी कितीहि निर्भर्त्सना केली, उपदेश