पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२१
औद्योगिक पुनर्घटना

चीन विभागाचे चिटणीस पो यि पो यांचें पांचशें कम्युनिस्ट कार्यकर्त्यांपुढे भाषण झाले. त्यांत त्यांनीं, चिनी कम्युनिस्ट पक्ष धनवंतांच्या कसा आहारीं चालला आहे, त्याची कथा सांगितली. ते म्हणतात, 'या धनलालसेपासून चीनमधील लोकशासन, लोकसेना व लोकसंघटना- कोणीहि मुक्त नाहीं. कांहीं कम्युनिस्ट कार्यकर्ते अत्यंत भ्रष्ट झाले असून त्यांनीं डाकूगिरी करून राष्ट्रीय संपत्तीचा अपहार चालविला आहे. देशाच्या औद्योगिक पुनर्घटनेला त्यांची कृत्ये अत्यंत विघातक आहेत. यामुळे चीनची कष्टकरी जनता असंतुष्ट होऊन आपल्यापासून दूर जात आहे. चीनच्या सर्व विभागांत ही अनीति व अधमपणा चालू असल्याची कम्युनिस्ट अधिकाऱ्यांचींच पत्रे आली आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे अनेक सदस्य भांडवलदारांचे गुलाम झाले असून ते हळूहळू चिआंगच्या प्रतिगामी सत्तेकडे झुकत आहेत. खोटे हिशेब ठेवणे, अफरातफर करणें यांत निष्णात असलेले कार्यकर्ते धारेवर धरले जात नाहींत, इतकेच नव्हे तर, कुशल व चतुर म्हणून त्यांना धन्यवाद मिळतात. या अधोगामी, भ्रष्ट व अत्यंत हीन नीतीविरुद्ध, या भांडवली वर्चस्वाविरुद्ध, आपण निकरानें मोहीम सुरू केली पाहिजे.' (भा. ज्यो. ६-१-५२)

अनेक आघाड्यांवरील संग्राम

 काँग्रेसच्या कार्याचें व तिनें धनिकांशी केलेल्या संग्रामांतील यशापयशाचें मूल्यमापन करतांना देशोदेशींच्या जनतेनें केलेल्या संग्रामांची वर दिलेली हकीकत आपण सारखी मनापुढे ठेवावी. तसे केल्याने अंतिम निष्कर्ष काढतांना आपण कोणची सावधगिरी बाळगली पाहिजे, हे ध्यानांत येईल. आणखीहि एक विचार आपण दृष्टीआड करता कामा नये. काँग्रेस सत्तारूढ झाली त्या वेळी या देशांत विरोधी शक्ति किती होत्या याचा एकदां आपण हिशेब करून पहावा. जवळ जवळ पांचशे संस्थानिक या देशांत होते आणि बंडाळ्या माजवून या देशांत उत्पात घडवून आणणे त्यांना सहज शक्य होतें. मध्यंतरी सौराष्ट्रांतील अत्यंत क्षुद्र गिरासदार व वतनदार यांनी काय धुमाकूळ घातला हे पाहिल्यावर सत्ताधारी नेत्यांना या बाजूने धोका गृहीत धरणें प्राप्त होते याविषय दुमत होणार नाहीं.
 भा. लो.... २१