पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१९
औद्योगिक पुनर्घटना

रक्षण करणे, आणि एकंदर अर्थक्षेत्र सर्वस्वीं कैचीत ठेवून त्यांत वाटेल ती उलथापालथ घडवून आणून जनतेला कल्याणकारक अशी अर्थव्यवस्था निर्माण करणे, हे कार्य इतके सुलभ आहे काय, याचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे.

शक्याशक्यता

 हा विचार करतांना पहिली व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण अशी ध्यानांत ठेविली पाहिजे की भांडवलाच्या सामर्थ्यास आळा घालण्यांत, या प्रबळ अशा शक्तीला वेसण घालून तिला राष्ट्रकार्याच्या रथाला जुंपण्यांत जगांत अजून ब्रिटनखेरीज कोणालाहि यश आलेले नाहीं. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभाला ब्रिटनमध्ये व त्या शतकाच्या मध्यानंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया, चीन या देशांत औद्योगिक क्रांति होऊन भांडवलदार कारखानदार वर्गाचे प्रभुत्व प्रस्थापित होऊं लागले आणि जनतेच्या नेत्यांना त्याची जाणीव होतांच, भांडवलदारविरुद्ध कष्टकरी जनता असा हा संग्राम तेव्हांपासून सुरू झाला. या संग्रामांत भांडवली सामर्थ्य सर्वस्वी पराभूत असे कोठेंहि झालेलें नाहीं, हा विचार आपण केव्हांहि दृष्टीआड करूं नये. या सामर्थ्यावर नियंत्रण घालून आर्थिक समता प्रस्थापित करण्यांत बऱ्याच अंशी फक्त ब्रिटन यशस्वी झालेले आहे. पण इटली, फ्रान्स यांसारखीं कांहीं राष्ट्र या अंत:कलहामुळे कायमचीं दुबळीं झालीं आहेत. पोलंड, झेकोस्लोव्हाकिया यांसारखीं कांहीं राष्ट्र दुबळीं होऊन स्वातंत्र्यालाहि आंचवली आहेत. जर्मनी हा मध्यंतरी बलसंपन्न झाला होता. पण तो दण्डसत्तेचा अवलंब करून ! आणि तरी सुद्धां भांडवलाच्या अघोरी वासनांमुळे शेवटी त्याची वाताहातच झाली. अमेरिकेंत लोकमत अत्यंत जागृत आहे. आणि तेथील कामगारांच्या संघटनाहि अतिशय प्रबळ आहेत. असें असूनहि परवां चार वर्षांपूर्वी तेथील धनिक वर्गानें आपल्या सामर्थ्याच्या जोरावर लोकसभेत कामगारांच्या संघटनांच्या विरुद्ध कायदे संमत करून घेतले. सध्यां सत्तारूढ असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला भांडवलदारवर्गाने किती पोखरून टाकले आहे व आपल्या किती लगामी लावले आहे हे पहाणे आपल्या पुनर्घटनेच्या दृष्टीनें उद्बोधक ठरेल. दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष ट्रूमन