पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१८
भारतीय लोकसत्ता

धक्का लावावयाचा नाहीं अशी दक्षता घेत आहे आणि त्यामुळे आपल्या औद्योगिक विकासाचें पाऊल मागेंच येत आहे, ही गोष्ट वादातीत आहे. राष्ट्रीयीकरणाविषयीचे आपले धोरण तर सरकारने निःसंदिग्ध शब्दांत जाहीर केले आहे. सरकारच्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून गराब जनता दिवसेंदिवस जास्त दीनदरिद्री होत आहे. धनिकांची संपत्ति वाढत असून आर्थिक विषमता पराकोटीस पोचला आहे, हे सिद्ध करण्यासहि अर्थशास्त्राच्या ज्ञानाची जरूर राहिलेली नाहीं. तेव्हां अर्थपंडितांनी सांगितल्याप्रमाणें वस्तुस्थिति आहे, घटना तशा घडत आहेत, हे सत्य आहे.
 प्रश्न आहे तो या घटनांच्या मीमांसेविषयीं व तिच्यावरून निघणाऱ्या निष्कर्षाविषयीं. वर उल्लेखिलेले अर्थवेत्ते, समाजवादी, साम्यवादी इ. विरोधी पक्ष आणि जनतेच्या कळकळीने प्रेरित झालेले इतर कार्यकर्ते यांनीं, काँग्रेस ही भ्रष्ट झाली आहे, तिच्या नेत्यांच्या ठायीं भांडवल नियंत्रणाची इच्छा नाहीं, गरीब जनतेविषयीचे तिचे प्रेम संपुष्टांत आलें आहे, उद्योगपतींच्या पुढे तिनें जाणूनबुजून शरणागति पत्करलली आहे, हे व अशा अर्थाचे आरोप केले आहेत. विरोधी पक्ष टीका करतात तेव्हां त्यांचा भावार्थ असा असतो कीं काँग्रेसचे नेते धनिकांचे साथीदार झालेले आहेत आणि अंगीं सामर्थ्य असूनहि ते औद्योगिक पुनर्घटनेला हात घालीत नाहींत व अशा तऱ्हेनें जनताद्रोह करीत आहेत. आम्हांला सत्ता प्राप्त झाली तर आम्ही भांडवलदार, कारखानदार, व्यापारी या वर्गाला पराभूत करूं आणि उद्योगधंद्यांचा विकास करून देशांतील आर्थिक विषमता समूळ नष्ट करूं.
 अर्थपंडितांनीं व कार्यकर्त्यांनी ही जी मीमांसा केली आहे तिचा, व विशेषतः विरोधी पक्षांनीं जी भूमिका मांडली आहे तिचा आतां आपणांस परामर्श घ्यावयाचा आहे. काँग्रेसवर केलेले सर्व आरोप मान्य केल्यावरहि आपण शांतपणें असा विचार केला पाहिजे की, आहे या स्थितींत दुसऱ्या कोणाला यापेक्षा जास्त कांहीं करणे शक्य झाले असतें काय ? उद्योगपतींवर नियंत्रण घालणे, त्यांच्याविरुद्ध जनतेची अभंग फळी उभारणे, आपल्या संघटनेंत धनबळानें कोणी फूट करूं लागला तर त्यापासून तिचे