पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
भारतीय लोकसत्ता


विषम समाजरचना

 पण हीं क्षेत्रें सोडून आपण सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांकडे वळलों म्हणजे समता, स्वातंत्र्य, व्यक्तित्वविकासाची संधि यांचा हळूहळू संकोच होत असलेला दृष्टीस पडतो. म्हणजे या क्षेत्रांत लोकशाहीला ओहोटी लागलेली दिसते. शूद्र आणि चांडाल आणि वैश्यापैकी बहुसंख्य शेतकरी यांना जेथें उन्नतीची कधीहि आशा नव्हती, कर्मविपाकाच्या सिद्धान्तावर ज्यांची श्रद्धा असल्यामुळे आपण याच स्थितींत रहाण्यास योग्य आहो अशी ज्यांची स्वतःचीच दुबळी समजूत झालेली होती आणि हीनगंडामुळे जे संघर्ष करण्यास कधीहि उद्युक्त झाले नाहीत, त्यांच्या समाजांत लोकशाही होती असे कदापि म्हणतां येणार नाहीं. या क्षेत्रांत समतेचे विचार मधून मधून उद्भवत होते; नाहीं असे नाहीं. 'दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् ।' अशासारखे विचार महाभारतांत सांपडतात. शूद्र गुणी असेल तर तो राजपदावर येण्यासहि हरकत नाहीं, असेहि सांगितलेले आढळते. जाति या गुणकर्मानुसार ठराव्या, ब्राह्मण हा कर्मानें शुचिर्भूत असेल तरच त्याला श्रेष्ठ पदवी द्यावी, एरवी त्याची योग्यता दासाइतकीच मानावी, असे समतेचे विचार महाभारतांत व उपनिषद्वाङ्मयांत मधूनमधून सांपडतात. बौद्धानी आपल्या धर्मसंघापुरती का होईना पण जातिभेदाची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कांहीं काळ करून दाखविला होता; पण एकंदरीत पहातां भारतीय समाजव्यवस्थेत समता व स्वातंत्र्य या तत्त्वांचा अवलंब केलेला आढळत नाहीं. ती व्यवस्था बव्हंशीं विषमच होती. आणि विषमतेचें तत्त्वज्ञान रूढ करून ती निर्मिलेली होती. डॉ. आळतेकर म्हणतात, त्याप्रमाणे याचा दोष राजव्यवस्थेकडे किंवा शासनसंस्थेकडे येत नसेल; पण ज्या शासनसंस्थेनें ही व्यवस्था चालू दिली व तिचे रक्षण केले तिला लोकायत्त शासन म्हणतां येणार नाहीं. आळतेकर म्हणतात की, त्याकाळीं राजसंस्था ही समाजाची एक कार्यकारी संस्था होती. परंपरा, रूढी, श्रुतिस्मृति याअन्वयें लोकांमध्ये जी समाजरचना मान्य असेल ती तशी टिकवून धरणे एवढेच तिचे काम होते. स्थित्यंतर घडवून आणणे हे तिचें काम नव्हते. असे असेल, तर ते लोकशाहीच्या कल्पनेला जास्तच मारक आहे. कारण त्या समाजव्यवस्थेला