पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

शकले. ख्रिस्तीधर्मानें इ. सनाच्या पहिल्या हजारबाराशे वर्षात मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगांवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवले होतें. शब्द प्रामाण्याची पराकाष्ठा करून धर्म, तत्त्वज्ञान, नीति, विज्ञान, कला या प्रत्येक क्षेत्रांत मानवी बुद्धि पंगु करून टाकली होती. कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ या शुद्ध विज्ञानवेत्यांच्या शिरावरहि धर्मसत्तेने शस्त्र धरले होते. तशा तऱ्हेची मानवी बुद्धीची गळचेपी प्राचीन काळांत भारतांतील गणराज्यांत तर नव्हतीच; पण एकतंत्री अशा राजसत्तेतहि नव्हती. आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाप्रमाणेच विज्ञानाच्या क्षेत्रांतहि या भूमींत नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहिर यासारखे थोर शास्त्रवेत्ते निर्माण होऊ शकले. सध्यांच्या काळांत हिटलरचा वंशवाद व स्टॅलिनचा मार्क्सवाद यांनींहि मानवी जीवनावर ख्रिस्ती धर्माप्रमाणेच सर्वंकष असे नियंत्रण घातले आहे. तसा प्रकार तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, साहित्य या क्षेत्रांत भरतखंडांत कधींहि झाला नाही. त्यामुळे प्राचीनकाळी भारतांत संस्कृतीची ही अंगे अत्यंत विकसित झालेली दृष्टीस पडतात. वर सांगितल्याप्रमाणे धर्मविद्याकलांचा हा विकास प्रजातंत्राप्रमाणेच नृपतंत्रांच्या काळींहि झालेला असला तरी प्रजातंत्रानें, 'या क्षेत्रांना राजसत्तेनें स्पर्श करावयाचा नाहीं,' हे जें स्तुत्य धोरण घालून दिले त्याचाच परिपाक सर्वत्र झाला असावा असे दिसतें. त्यामुळे भारतांतील या वैभवाचे श्रेय कांहीं अंशीं तरी त्या शासनपद्धतीला द्यावें असें वाटते. इतिहाससंशोधन करतांना प्रजातंत्रे इ. स. पूर्व सहाव्या शतकांत उदयास आली असे पंडित म्हणतात, पण विवेचन करतांना मागल्या काळांत जाऊन श्रीकृष्णाच्या काळींहि प्रजातंत्रे अस्तित्वांत होतीं, असे सांगतात. स्वतः श्रीकृष्ण हा अंधकवृष्णींच्या संघाचा अध्यक्ष होता, असे या पंडितांनी म्हटले आहे. म्हणजे प्रजातंत्राचा उदय पुष्कळच पूर्वीच्या काळी झाला असला पाहिजे असे दिसते. त्यांत राजकीय व सामाजिक क्षेत्रांत जरी त्याची परिणति झाली नाहीं, तरी वर सांगितल्याप्रमाणे धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान व कला या क्षेत्रांत नागरिकांना स्वातंत्र्य मिळून भारताच्या संस्कृतीची त्या क्षेत्रांत अलौकिक अशी परिणति घडवून आणण्यास त्यांना अवसर मिळाला हेंहि कांहीं थोडें नाहीं.