पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०८
भारतीय लोकसत्ता

वाटत नाहीं. तेव्हां भारतांतला भांडवलदार- कारखानदार- व्यापारी हा जो महासमर्थ, कर्तबगार, व सर्वप्रकारच्या साधनांनी संपन्न असलेला असा वर्ग त्याने भारताच्या लोकसत्तेच्या दृष्टीनें स्वतंत्रपणे व सरकारशीं सहकार्य करण्याच्या मार्गाने प्रगतीला कितपत हातभार लाविला याचा विचार प्रथम केला पाहिजे.

भांडवलदारांची कहाणी

 दुर्दैवानें ही कथा अत्यंत शोचनीय व उद्वेगजनक अशी आहे. या वर्गाच्या ठायीं ध्येयनिष्ठा तर नाहींच, पण पाश्चात्य देशांतील अगदीं स्वार्थी अशा धनिकांनीसुद्धां उत्पादनवाढीची जी एक प्रचंड आकांक्षा धरली व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें मानवी संस्कृतीच्या प्रगतीस जिच्यामुळे हातभार लाविला, तो स्वार्थमूलक पण कांहींशी सुसंस्कृत आकांक्षासुद्धां या वर्गाच्या ठायीं नाहीं. बहुसंख्य मानव हा स्वार्थलोलुपच असतो आणि तो केव्हांहि तसाच रहाणार. पण या स्वार्थाच्या प्रेरणांनाच जरा उजळ रूप मिळाले तरी त्या मानवी प्रगतीला साह्यभूत होतात. पण या देशांतल्या धनिकांनीं आपल्या स्वार्थाला तेवढाहि उजाळा दिला नाहीं. त्यामुळे भारताच्या औद्योगिक पुनर्घटनेविषयीं विचारवंतांच्या मनांत फार निराशा पसरून राहिलेली आहे. या प्रकरणाची सम्यक् कल्पना येण्यासाठी भांडवलदार, कारखानदार, व्यापारी या वर्गांचें गेल्या कांही वर्षांचें चरित्र आपण पाहूं.

कापड

 अहमदाबादच्या कापडाच्या गिरण्यांचा हिशेब पुढे दिला आहे. थोड्याफार फरकानें हिंदुस्थानांतील सर्वच कापडगिरण्यांना तो लागूं पडेल याविषयीं अर्थशास्त्रवेत्यांत दुमत होणार नाहीं. १९३९ सालीं अहमदाबादच्या प्रत्येक गिरणीस सरासरी २.५ लक्ष रुपये ठोक फायदा होत असे. त्या सालीं युद्ध सुरू झाले आणि ही आपली पर्वणी आहे हे धनपतींनी जाणले. १९४२ साली ११ लाख व १९४३ सालीं प्रत्येक ४० लाख रुपये फायदा त्यांनी वसूल केला. पुढे नियंत्रण बसले तरी त्या काळांतहि प्रत्येक गिरणीस सरासरी १७ लाख रु. फायदा होत होता. १९४७ सालीं, कापसाचे भाव