पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०६
भारतीय लोकसत्ता

आजचे सर्व प्रश्न दत्त म्हणून तेथील लोकांपुढे उभे राहतील. सुदैवानें, आपण आधीपासूनच त्यांच्या सोडवणुकीच्या मार्गाला लागलो आहों; तेव्हां याहि बाबतींत आपण शांतपणे आणि विवेकाने आपल्या सरकारच्या, काँग्रेसच्या व लोकांच्या प्रगतीचे मूल्यमापन केले पाहिजे.

तटस्थता घातक ठरेल

 गेल्या प्रकरणांत राजकीय पुनर्घटनेचें विवेचन करतांना जो विचार सांगितला, तोच आतां येथे जरा जास्त विशद केला आहे. आणि पुढे औद्योगिक पुनर्घटनेचे परीक्षण करतांना त्याकडेच वाचकांचें लक्ष मी वेधणार आहे. सध्या आपल्या देशाच्या उत्कर्षाचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यांत कितीहि दोष असले, उणीवा असल्या, त्यांतील अधम प्रकारामुळे आपल्याला कितीहि उद्वेग आलेला असला तरी अलिप्त त्रयस्थ अशा टीकाकाराच्या भूमिकेवरून आपण त्यांकडे पाहूं नये. हे दोष दुसऱ्या कोणाचे तरी आहेत, काँग्रेसचे, सरकारचे किंवा इतर कोणा पक्षाचे आहेत, आपला त्यांशी संबंध नाहीं, आपण त्यांचे जागी असतो तर काहीं निराळेंच करून दाखविलें असतें असा वृथा अहंकार आपण मनांत बाळगूं नये. तर आपले सर्व बळ खर्च करून त्यांत प्रथम सहभागी व्हावें, ही आपलीच जबाबदारी आहे हे जाणून त्यांत सामील व्हावे आणि मग काय टीका करावयाची ती करावी. हा देश माझा आहे, त्याचे जे गुणदोष ते माझे गुणदोष, व त्याचा जो उत्कर्षापकर्षं तोच माझा उत्कर्षांपकर्ष ही भूमिका ज्यांनी स्वीकारावयाची त्यांनींच जर त्रयस्थाची भूमिका स्वीकारली तर हा देश आपला म्हणावयास परकीय लोक नेहमीं सिद्ध आहेतच.



प्रकरण अकरावें
औद्योगिक पुनर्घटना

 लोकसत्ता ही समृद्धि, विपुलता, धनधान्याची सुबत्ता यांवर अवलंबून असते, दरिद्री देशांत लोकसत्ता परिणत होऊं शकत नाहीं, इतकेंच नव्हे तर