पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०५
कृषिपुनर्घटना

दिलेली आहे. तीहि या प्रश्नाचा विचार करतांना वाचकांनी जमेस धरावी. त्याचप्रमाणे रशिया व चीन येथें अन्नधान्याचा तुटवडा असून, कडक नियंत्रण व रेशनिंग हे उपाय तेथें जारी केले जात आहेत या नुकत्याच आलेल्या बातम्यांकडेहि (टाइम्म ऑफ इंडिया. ६-३-५४ व ७-३-५४) त्यांनी लक्ष द्यावें.
 चीन व रशिया येथील प्रगतीशी आपल्या देशांतल्या मंदगतीशी तुलना करतांना आणखी एक विचार मनापुढे सतत ठेवला पाहिजे. एकतर तेथील समृद्धीच्या प्रगतीच्या, नंदनवनाच्या बातम्या स्वीकारतांना त्यांत वाद घालूनच त्या स्वीकारल्या पाहिजेत. पण पुष्कळ लोकांना हे पटत नाहीं. चीन-रशियामध्यें खरीखुरी समृद्धि निर्माण झाली आहे, अशी त्यांना खात्री वाटते. आपल्याकडचे अनेक विद्वान्, अनेक कलाकार व अनेक अर्थवेत्ते यांनी दिलेल्या पुराव्यावर अविश्वास दाखविणे त्यांना युक्त वाटत नाहीं. पण क्षणभर चीन-रशियाच्या संपन्नतेच्या वार्ता खऱ्या धरल्या तरी वर सांगितल्याप्रमाणे आपण हे मनापुढे सतत ठेविले पाहिजे की, ते देश दण्डसत्तेच्या मार्गानें चालले आहेत आणि आपण लोकसत्तेच्या मार्गाने चाललो आहोत. यामुळे सध्यांच्या पेक्षां गति वाढविणे हे अशक्य आहे. पण यामध्ये आपले कांहीं अहित होत आहे असा मात्र समज वाचकांनी करून घेऊं नये, लोकसत्तेची जोपासना आपण करीत आहोत याचा अर्थ असा कीं 'व्यक्तित्व' या सर्वात श्रेष्ठ धनाची आपण जोपासना करीत आहो. मानवाचा सर्व क्षेत्रांत विकास व्हावयाचा तो या धनाच्या जोरावरच होणार. सुबत्ता निर्माण झाली तर ती यांतूनच होणार. दंडसत्तेनें कचित् द्रुतगतीने सुबत्ता निर्माण होईलहि; पण ती जनतेच्या पदरांत कितपत पडेल याची शंका आहे. जे अल्पसंख्य दंडसत्ताधार लोक असतात ते उत्पन्न झालेल्या धनांचा वाटा सर्व जनतेला देतील, धनाची समवांटणी करतील ही आशा करणे व्यर्थ आहे. हेच तर जगांतले मोठे दुःख आहे आणि लोकसत्ता हा त्या दुःखांवर उपाय म्हणून निर्माण झाला आहे. आज चीन व रशिया येथें लोकांत व्यक्तित्वजागृति झालेली नाहीं. ती उद्यां होऊं लागली म्हणजे तेथें प्रचंड प्रक्षोभ निर्माण होतील आणि मग भारतापुढचे
 भा. लो.... २०