पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०४
भारतीय लोकसत्ता

निर्माण करू शकतील; पण नवीन समाजरचना करावयाची असेल तर त्या गोष्टी अप्रस्तुत आहेत.

चीनमधील स्वर्ग

 चीनमध्यें इतक्यांतच सर्वत्र सुबत्ता व समृद्धि नादूं लागली आहे, अशा वार्ता सगळीकडून येत आहेत. आपल्याकडले विद्वान् लोक, कलाकार लोक तेथे जाऊन येऊन त्या वार्तांना पुष्टीच देतात. वाचकांनी हे ध्यानांत ठेवावें कीं, चीनमध्यें अजून अल्लाउद्दीनाचा दिवा सांपडलेला नाहीं. ३० डिसेंबर १९५३ च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये 'चायना फेसेस हार्ड फॅक्टस्' हा लेख आलेला आहे. तो वाचला तर तेथील समृद्धि, सहकार्य व त्यामुळे निर्माण झालेला स्वर्ग यांवर चांगला प्रकाश पडेल, त्यांतील माहिती चीनमधील 'पीपल्स डेली' या पत्राच्या आधारे दिलेली आहे. त्यांतील माहितीचा तात्पर्यार्थ असा- चीनमध्ये अन्नआघाडीवर कठिण परिस्थिति आली आहे. अर्थमंत्री पो यि पो यांनी १९५३ च्या फेब्रुवारी मध्ये, चीनचें आयव्यय पत्र जमत नाहीं, जमाखर्चाची तोंडमिळवणी होत नाहीं, असें जाहीर केले. दुष्काळामुळे अपेक्षित पीक आले नाहीं आणि कारखानदारींत अपेक्षित उत्पादन होत नाहीं. सरकारी कारखान्यांतहि अपेक्षेप्रमाणे उत्पादन आलेलें नाहीं. अवर्षण, पूर, टोळधाड यांनी यांगत्सीच्या दक्षिणेस दहा लाख एकर जमीन दुष्काळी झाली आहे. चीनपुढचा मुख्य प्रश्न कर्तबगार नेत्याची उणीव, जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव आणि तंत्रविशारदाची वाण हा आहे. त्यामुळे उपकरणांची नासधूस, अपघात, धनाचा अपव्यय, उधळपट्टी हे परिणाम होत आहेत. माल विकत घेणें, ताब्यांत ठेवणे व त्याचा वापर करणे याची कसलीच पद्धत ठरलेली नाही. त्यामुळे खर्चाला मर्यादा नाहीं, सामानाचा हिशेब नाहीं. आणि विध्वंस, अपव्यय हे अपरिहार्य होऊन बसलें आहे.' आपण आपल्या लोकसत्तेचा तुलनेनें अभ्यास करावा असे जे या ग्रंथांत पदोपदीं सांगितलें आहे, त्याचा अभिप्राय आतां वाचकांना स्पष्ट होईल, अशी आशा आहे. पुढें औद्योगिक पुनर्घटनेचा विचार करतांना त्या प्रकरणांत चीनमधील नंदनवनाविषयींचा भ्रम नाहींसा होईल अशी आणखी थोडीशी माहिती