पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०२
भारतीय लोकसत्ता

पूर्वतयारी करीत आहे.' असे त्यांनी उत्तर दिले. लोकायत्त शासनाचें सर्व सार या वाक्यांत सांठविले आहे. सध्यां सरकारनें जमीनदारीच्या नाशाचा कायदा केला आहे. इतरहि अनेक लोककल्याणाचे कायदे केले आहेत; पण त्यांचा अंमल करण्याचे सामर्थ्य सरकारजवळ नाहीं. जनशक्ति जागृत झाली तर ते सामर्थ्य त्याच्या ठायीं येईल. लोकांचे जमिनीच्या वाटपासाठी मतपरिवर्तन घडवून आणून ती लोकशक्ति मी निर्माण करीत आहे असें विनोबा म्हणतात. याचा अर्थ असा की, सरकारी कायदा पांगळा झाला असला, सरकारी योजना अपयशी होत असल्या तर तो आपला, लोकांचा दोष आहे व तें अपश्रेय आपलेच आहे असे ते मानतात. लोकसत्तेच्या यशाचें हेंच रहस्य आहे.

जनशक्तीची आवश्यकता

 अनेक पंडितांनीं उद्योगधंद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविषयी जे लिहिले आहे तेंच जमीनदारीलाहि लागू आहे. हे सर्व धन समाजाच्या मालकीचे करून टाकण्यास नुसता कायदा कधींच समर्थ होणार नाहीं. त्याच्या मागें प्रचंड लोकशक्ति उभी पाहिजे. 'रिफ्लेक्शनस् ऑन दि रेव्होल्यूशन ऑफ अवर ओन टाइम' या आपल्या ग्रंथांत ब्रिटनमधील मजूरपक्षाचे तत्त्ववेत्ते प्रा. लास्की यांनीं ब्रिटिश जनतेला काय इषारा दिला होता ते पहा. हा ग्रंथ त्यांनी दुसरे महायुद्ध चालू असतांना १९४२- ४३ साली लिहिला. युद्धसमाप्तीनंतर निवडणुकी व्हावयाच्या होत्या. त्यांत मजूरपक्ष निवडून येऊन अधिकारारूढ झाला तर उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण आम्ही करूं, असे आश्वासन जाहीरनाम्यांत त्या पक्षाने दिले होते. त्याविषयीं लिहितांना लास्की म्हणाले की, 'या निवडणुकीत जनतेनें आम्हांला प्रचंड बहुमतानें, तीन चतुर्थापेक्षा जास्त मतांनी निवडून दिले तरच हे राष्ट्रीयीकरण आम्ही करूं, एरवीं ५१|५२ आमच्या बाजूस व ४९|४८ दुसऱ्या पक्षाला अशी जर मतांची विभागणी झाली, तर कसल्याहि सुधारणा आम्ही करणार नाहीं. राष्ट्रीयीकरण ही अगदी मूलगामी सुधारणा आहे. ही क्रान्ति आहे. ती सर्व जनतेच्या पाठिंब्यानेंच करता येईल. तो मिळत नसेल तर येथें ती सुधारणा करूं लागतांच यादवी होईल व मग लोकसत्तेचा बळी पडेल.