पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०१
कृषिपुनर्घटना

घडवून उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. हे प्रयत्न व त्याच्या मागल्या प्रेरणा व त्यांची फलिते आपण पाहिली तर वाचकांच्या हे ध्यानांत येईल कीं, आजचा हा क्षण असा आहे की या वेळी प्रत्येकाने आपल्या या पुनर्घटनेच्या प्रयत्नासाठी आपल्याला जे कांहीं करतां येण्याजोगे आहे त्याची पराकाष्ठा केली पाहिजे. सरकारला नांवें ठेवून, काँग्रेसच्या सभासदांच्या हीन प्रवृत्तीकडे बोट दाखवून कोणीहि यावेळी आपल्या शिरावरची जबाबदारी टाळतां कामा नये. सरकार व काँग्रेस त्या स्वरूपाची असली तर आपल्या माथ्यावरची जबाबदारी कमी न होतां ती उलट दुप्पट होते हें प्रत्येकानें जाणले पाहिजे. याचेंच नांव लोकसत्ता. सुदैवानें सरकारी व लोकप्रेरित असे दोन्ही प्रयत्न येथे चालू आहेत. त्यांत ज्याला शक्य त्याने सहभागी झाले पाहिजे. परवां मद्रासजवळील मीनांबकम् या गांवीं नव्या महाविद्यालयाचे उद्घाटन करतांना आपले उपाध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणाले कीं, 'सध्यां महाविद्यालयामध्येंच- कॉलेजमध्येच नव्या राष्ट्राची घडण होत आहे. भारताच्या या थोर तत्त्ववेत्त्याचे बोल सार्थ करावे असे तरुणांना वाटत असेल तर त्यांनीं हें ध्यानांत ठेवावें. वरीलपैकी कोठल्यातरी योजनांत सहभागी होऊन त्यांनी अत्यंत दृढ निश्चयाने त्या तडीस नेण्याची कसोशी केली पाहिजे. एक पाटबंधारा देशांत उभा राहिला तर तेवढी लोकसत्ता जवळ आली, असा हिशेब त्यांनी मनाशी ठेवावा. एक एकर शेती पाण्यानें भिजण्याची व्यवस्था करणे किंवा एक किलोवॅट वीज निर्माण करणें हें आज मूर्तिमंत पुण्य आहे. आणि त्याचें फल इहलोकींच मिळणार आहे. एका गांवाची संघटना करणे या पुण्याला तर तुलनाच नाहीं. गांव हा आपल्या लोकसत्तेचा आद्य घटक आहे. तो दृढ झाला तर लोकसत्ता स्थिर होईल. म्हणून ब्रिटिशांशीं लढा करणे हे जसें इतके दिवस आपण परमोच्च ध्येय मानीत होतों तसेंच ह्या तऱ्हेची संघटना हें आपलें परमोच्च ध्येय आतां मानलें पाहिजे.
 सध्यांच्या सरकारी योजनांवर सगळ्यांत जास्त व कठोर टीका करण्याचा अधिकार विनोबांचा आहे; पण त्यांनींच सहकार्याची भूमिका घेतली आहे. जमीनीच्या वांटपाचा कायदा करून घेण्याकडे तुम्ही आपले शक्तिसर्वस्व कां खर्च करीत नाहीं, अर्से त्यांना कोणीं विचारलें; तेव्हां 'त्या कायद्याचीच मी