पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३००
भारतीय लोकसत्ता

जशाच्या तशा आहेत. हे सर्व हीण या यज्ञांत आतां जळून खाक होत आहे. क्रान्ति ही जीवनाच्या एकाच अंगापुरती मर्यादित रहात नाहीं. ती लवकरच सर्व जीवन व्यापते. भूदानयज्ञांत तोच अनुभव येत आहे. विनोबाजी हें सर्व बुद्धिपुरःसर घडवीत आहेत. सकृतदर्शनी त्यांची भाषणे सनातनी वृत्तीचीं वाटतात. अत्यंत सौम्य, परंपरानिष्ठ अशी वाटतात. पण त्यांत अत्यंत स्फोटक अशीं क्रान्तिबीज भरलेली असतात. "कांहींजण म्हणतात की हें कलियुग आहे. पण याच युगांत गांधीजी झाले. त्रेता व द्वापर युगांत रामकृष्ण झाले, तसेच कंस व रावणहि झाले. तेव्हां युगाच्या गोष्टी बोलूं नयेत. हे कलियुग नाहीं. युग आम्ही बनविणार आहों. मी तर म्हणतों की सत्ययुग जवळ आले आहे." "आम्ही स्वतः थंडींत कुडकुडत असतां दगडाच्या मूर्तीला कपडे घालायचे, तिच्याकरतां घर करायचे, हे नाटक तुम्ही कुठपर्यंत करणार आहां ?" 'कोणी म्हणतात, मंगळ, शनि यांचा आपल्यावर परिणाम होतो. मी म्हटले आपण चेतन आहो. मंगळ अचेतन आहे. तेव्हां आपलाच परिणाम मंगळावर होईल.' 'परिस्थितीला आम्ही घडवूं शकतो; परिस्थितींतून आम्ही निर्माण होतो हें चूक आहे.' 'गरीब जनता सर्व अन्याय सहन करते हें तमोगुणाचें लक्षण आहे.' या त्यांच्या वेळोवेळच्या उद्गारांवरून त्यांची वाणी सौम्य असली तरी तिच्यांतील आशय किती क्रान्तिकारक आहे, याची कल्पना येईल. या सर्वांवरून भूदानयज्ञामध्ये आर्थिक विषमता व अन्याय यांच्याप्रमाणेच सामाजिक आणि धार्मिक विषमता व अन्याय यांचीहि आहुती दिली जाईल असा विश्वास वाटतो.
 भारतांत कृषीच्या पुनर्घटनेसाठी कोणकोणते प्रयत्न चालू आहेत ते येथवर सांगितले. आरंभी सांगितल्याप्रमाणे या कार्याची दोन अंगे आहेत. जमिनीची सम वांटणी घडवून आणणे हे एक आणि अनेक प्रकारच्या साधनांनी उत्पादनाची वाढ करणे हे दुसरे. दोन्ही अंगांनी सरकारच्या प्रेरणेनें व लोकांच्या स्वयंप्रेरणेने असे प्रयत्न चालू आहेत. जमीनदारीचा नाश करावा म्हणून सरकारनें कायदा केला आहे, आणि विनोबाजींनी भूदान- यज्ञाचे आंदोलन सुरू केले आहे. अधिक उत्पादनासाठी पंचवार्षिक योजना व ग्रामविकासयोजना सरकारने आंखल्या आहेत आणि अनेक ठिकाणी गांवगांवचे कार्यकर्ते आपल्या गांवाची सहकारी पद्धतीने संघटना