पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९९
कृषिपुनर्घटना

वादी क्रान्ति' या आपल्या लेखांत (साधना १३ जून ५३) आचार्य जावडेकरांनी आपला तसा स्पष्ट अभिप्राय नमून केलेला आहे. स्वामित्वाची भावना नष्ट करून सर्व धन व धनसाधनें समाजाच्या मालकीची करणे हा समाजवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. विनोबांनी नेमकें हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेलें आहे. २८ मे १९५३ च्या भूदानयज्ञ-पत्रिकेंत विनोबा म्हणतात, 'जमिनीवर कोणाचाच स्वामित्वाचा हक्क रहातां कामा नये हे मी समाजाला शिकवूं इच्छितो. श्रीमंत जसे आपल्याला जमिनीचे मालक समजतात तसे गरीबहि समजतात. या दोघांनाहि स्वामित्वाच्या भावनेतून मी मुक्त करूं पहातो.' विनोबा श्रीमंतांकडून जसे दान मागतात तसें गरिबांकडूनहि मागतात; यांतील हें रहस्य आहे. त्याचे विवेचन करतांना आचार्य जावडेकर म्हणतात, 'रशियांत प्रथम श्रीमंतांच्या जमिनी घेण्यांत आल्या. त्यानंतर सामुदायिक शेतीच्या प्रयोगास आरंभ झाला. तेव्हां गरीब शेतकऱ्यांच्या स्वामित्व भावनेशीं सरकारला झगडावे लागले. आणि मग स्टॅलिनला दण्डसत्ता वापरावी लागली. त्यादृष्टीने पहातां मोठ्या आणि छोट्याहि जमीन-मालकांच्या विचारांत, स्वामित्वासंबंधीची क्रान्ति घडवून आणणे किती महत्त्वाचे आहे व किती बिकट आहे याची कल्पना येऊ शकेल. आचार्य विनोबा ही क्रान्ति करीत आहेत. समाजवादी पक्षाला अभिप्रेत असलेली वर्गहीन समाजरचना या आंदोलनांतूनच पुढे निर्माण होईल.' असा जावडेकरांनी आपला विश्वास याच लेखांत प्रगट केला आहे.

मन्वंतर

 हें आर्थिक क्रान्तिविषय झाले. पण भूदानयज्ञाचा येवढाच अर्थ नाहीं. वर म्हटले आहे त्याप्रमाणे या यज्ञामुळे त्या त्या प्रदेशांच्या जनतेच्या जीवनांत समूळ क्रान्ति होत आहे. 'भूदान यज्ञाच्या क्रान्तिगर्भातून एक सर्वांगीण क्रान्ति उदयाला येईल, असें मला दिसत आहे' असे जयप्रकाश नारायण चांदिल येथील भाषणांत म्हणाले, विनोबाजींच्या बरोबर जे अनेक स्त्री पुरुष कार्यकर्ते फिरत आहेत, त्यांनी अशींच वर्णन केलीं आहेत. बिहारमध्यें व उत्तर हिंदुस्थानांतील बऱ्याच प्रदेशांत अजून बुरख्याची चाल कडक रीतीने पाळतात. जातिभेद, अस्पृश्यता या दुष्ट रूढि पुष्कळ ठिकाणीं