पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९८
भारतीय लोकसत्ता

शेकडों एकर जमीन स्वतःजवळ ठेवणे हें पाप आहे, त्यांच्या प्रपंचाची तरतूद करण्यासाठी आपण आपला धनलोभ सोडला पाहिजे, हा विचार लाख एकरांच्या मालकापासून चारपांच एकरांच्या मालकापर्यंत हजारो भारतीयांच्या मनांत दृढ करून टाकणें आणि लोभावर जय मिळवून जमिनीसारखें धन त्यांना सोडावयास लावणे याला खरोखरच मानवी इतिहासांत तुलना नाहीं. राष्ट्रधर्म, समाजधर्म, मानवधर्म या सगळ्यांचे उदात्त संस्कार या एका पुण्यप्रद विचारांत व कृतीत सामावलेले आहेत. मानव बाह्यतः लोभी, स्वार्थी, तमोगुणी दिसला तरी अंतरांत तो सत्त्वगुणी आहे, हा विचार यापूर्वी अनेक महात्म्यांनी सांगितलेला आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणांनीं तो सिद्ध करून दाखविणारे विनोबाजी हेच पहिले पुरुष आहेत. ब्रिटनच्या इतिहासांत सामान्य माणसांनी राष्ट्राच्या आपत्तीच्या काळीं धनलोभ सोडून राष्ट्राला साह्य केल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. अनेकांनी कर्जरोखे सरकारला परत केले, अनेकांनी व्याजाचे दर आपण होऊन कमी करून घेतले, कामगारांनी पगारवाढ नको म्हणून सांगितले, जास्त तास काम करण्यास त्यांनी मान्यता दिली, अशी वृत्ते ब्रिटन-मधून नित्य येत असत आणि त्यांची ही राष्ट्रनिष्ठा पाहून नंतर आपल्या देशाकडे पहातां लज्जेनें मान खाली घालावी असे आतांपर्यंत वाटत असें, पण भारतीय जनताहि, येथले धनिक, येथले गरीब, सर्व राष्ट्रधर्माच्या या आवाहनाला तितक्याच निष्ठेनें साद घालतात असें विनोबांनी दाखवून दिले आहे; किंबहुना भारतांतील ही घटना इतर देशांतल्या कोणच्याहि निःस्वार्थी, त्यागमय घटनांपेक्षां शतपटीने मोठी आहे असेंहि म्हणण्यास हरकत नाहीं. सर्व देशामध्ये कसलीहि दण्डसत्ता न वापरतां आर्थिक क्रान्ति घडविण्याइतका मानवाचा विवेक जागृत झाल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासांत अजून घडलेले नाहीं. ही मानवाची उंची ज्या भूदान यज्ञामुळे वाढत आहे त्यासाठी वाटेल ते मोल देण्यास हरकत नाहीं असेंच कोणाहि विचारवंताचे मत होईल.

भुदानानें समाजवादी क्रान्ति

 समाजवादी पक्षाच्या मताने तर त्यांना इष्ट असलेली समाजवादी क्रान्ति या भूदान आंदोलनांतून घडून येणार आहे. 'भूदान-यज्ञ आणि समाज