पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भारतीय लोकसत्ता

लिच्छवि विदेह इ. अनेक लोकराज्ये किंवा गणराज्ये होऊन गेली. व इ. सनाच्या चवथ्या शतकांत गुप्त साम्राज्याच्या काळांत हीं सर्व गणराज्ये नष्ट झाली. असे असले तरी जवळजवळ एक हजार वर्षांचा दीर्घ अवधी या राज्यांच्या उदयाला व विकासाला मिळाला होता. त्यांच्या सर्व अंगोपांगांच्या वाढीला हा अवधि अगदी पुरेसा आहे. या गणराज्यांचा अभ्यास करून लोकशाहींविषयीं कांहीं निष्कर्ष काढावयासहि ह्या भारतांतील प्राचीन काळच्या प्रयोगाने अगदी परिपूर्ण साधनसामुग्री दिली आहे. म्हणून आतां या लोकसत्ताकांचें सविस्तर विवेचन करावयाचें आहे.

प्राचीन लोकसत्तांचे स्वरूप

 इ.स.पू.६०० ते इ.स. ४०० हा लोकसत्तांचा काळ म्हणून वर सांगितले; पण या काळांत या लोकसत्ता एकाएकी उदयास आल्या नाहींत. त्याच्या आधींच्या काळांतहि या प्रकारच्या शासनाचीं कांहीं पूर्वचिन्हें दृष्टोत्पत्तीस येत होतीं. तशा प्रकारची पूर्वतयारी चालू होती. वेद-काळामध्ये सामान्यतः भारतांत सर्वत्र राजसत्ताच प्रचलित होती. या काळांतहि कांहीं वैराज्ये म्हणजे गणराज्ये होती असा उल्लेख कोठे सांपडतो; पण तो अपवादात्मक होय. एकंदरीत पहातां वेदकाळ हा नृपतंत्राचा म्हणजे राजसत्तेचा काळ होता; पण असे असले तरी त्या काळांत राजा हा सर्वस्वी अनियंत्रित होता असे मात्र नव्हें. 'समिति' या नांवाने लोकसभेच्या स्वरूपाची एक सभा त्यावेळीं अस्तित्वांत आली होती आणि राजसत्तेवर तिचें पुष्कळच नियंत्रण होते. कुलाच्या मुख्याला त्या काळीं कुलपति म्हणत. अनेक कुलांच्या समुदायास 'विश्' अशी संज्ञा होती आणि त्यांच्या मुख्यास 'विश्पति' म्हणत. समितीत प्रायः कुलपति व विश्पति हे सभासद असत. हे सभासद त्याकाळीं प्रबळ व सत्तासंपन्न असल्यामुळे त्यांच्या समितीचें राजसत्तेवरचें नियंत्रण चांगलेच प्रभावी होत असे. समिति राजाला अनुकूल नसणे ही राजावरची सर्वात मोठी आपत्ति होय, तो शापच होय, असे अथर्व वेदांत म्हटले आहे.
 समितीप्रमाणेच सभा नांवाची दुसरी लोकायत्तसंस्था त्या काळी होती. डॉ. आळतेकरांच्या मतें सभा ही खेड्यांतली संस्था आणि समिति ही सर्व राज्याची नियामक संस्था होय. डॉ. जयस्वालांच्या मते सभा हे समितीचे