पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भारतीय लोकसत्ता
प्रकरण १ लें
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

 भरतभूमीच्या प्राचीन इतिहासांतील इ. स. पू. ८०० ते इ. स. ६०० हा काळ अत्यंत वैभवाचा होता, याविषयीं पाश्चात्य- पौर्वात्य कोणाहि पंडितांमध्यें दुमत नाहीं. सर्व प्रकारच्या विद्या, कला, शास्त्रें यांचा या भूमींत जो विकास झाला तो याच काळांत. या भूमीला चिरंतन ऋणी करून ठेवणारे महान् तत्त्ववेत्ते, थोर सम्राट्, धर्मप्रवक्ते, साहित्यसम्राट् हेहि बहुतेक सर्व याच काळांत होऊन गेले आणि आतां नव्या संशोधनाअन्वयें असें दिसतें कीं, भारतामध्यें लोकसत्तांचा उदय होऊन त्यांचा उत्कर्ष झाला तोहि याच काळांत. इतिहासांतले हें सत्य प्रकाशांत आणून या संशोधकांनी लोकशाहीच्या एका फार मोठ्या सिद्धान्ताला पुष्टीच दिली आहे. एखाद्या समाजाला कोणच्याहि क्षेत्रांत जें वैभव प्राप्त होतें, तें त्या क्षेत्रांत माणसांना चिंतन, मनन करण्यास आणि त्यांतून निघणारी तत्वें व विचार यांचा लोकांत प्रसार करण्यास जें स्वातंत्र्य मिळालेलें असतें त्यामुळे होते आणि अशा स्वातंत्र्यावांचून संस्कृतीच्या कोणच्याहि अंगाची जोपासना होत नाहीं, हा तो सिद्धान्त होय. भारताच्या प्राचीन इतिहासांतला जो परमोच्च वैभवाचा काळ तोच लोकसत्ताकांच्याहि उत्कर्षांचा काळ होता हें या दृष्टीने अत्यंत सुसंगत असेंच दिसतें. इतिहासांतल्या घटनांमध्ये यामुळें एक उत्तम सुसंवाद निर्माण होतो आणि यासाठींच या अभ्यासाचे महत्त्व फार आहे.
 डॉ. जयस्वाल व डॉ. आळतेकर यांच्या मतें साधारणतः इ. स. पू. ६०० ते इ. स. ४०० हा भारतांतील प्राचीन लोकराज्यांचा किंवा प्रजातंत्रांचा काळ होय. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या उत्तर हिंदुस्थानातील प्रांतांत या काळांत न्यासा, कठ, मालव, क्षुद्रक, कंबोज, त्रिगर्त, कोलिय,