पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९७
कृषिपुनर्घटना

सारख्यांनासुद्धां त्याचें महत्त्व पटून त्यांनी आपले पूर्वीचें पक्षीय राजकारण सोडून सध्यां तन, मन, धन या कार्याला अर्पण केल्यामुळे येथें दुसरी एक शक्ति येऊन मिळाली असे स्पष्ट दिसतें. अशा रीतीनें थोड्याच दिवसांत भारतांतल्या साऱ्या शक्ति जर या कार्यावर केंद्रित होतील तर तो यज्ञ चालू असतांना त्यांतून आणखी शक्ति निर्माण होतील, आणि मग एकहि गोळी न झाडतां, कशाचाहि विध्वंस न करतां, इतकेच नव्हे तर कठोर शब्दाचाहि वापर न करता जगांतली एक अभूतपूर्व क्रांति या भूमीत घडून येईल असे स्वप्न आज दिसूं लागले आहे.

उदात्त संस्कार

 या भूदान यज्ञावरहि अनेक पंडितांनी आक्षेप घेतले आहेत. यांत जमिनीचें तुकडे फार होतील, त्यामुळे उत्पादन घटेल, सामुदायिक शेती हें आपलें ध्येय असतांना आज प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र मालकीची जमीन करून दिली तर पुन्हां व्यवस्था बदलतांना जड जाईल, अशा तऱ्हेचे आक्षेप यावर घेतले जातात. त्या आक्षेपांना जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, स्वत: विनोबाजी यांनी उत्तरे दिली आहेत. बहुतेक सर्व आक्षेप अर्थशास्त्रीय दृष्टयाहि निराधार आहेत हे त्यांनी दाखविलेंच आहे; पण याहिपेक्षां या सर्व आक्षेपकांना, भूदान यज्ञाचे पुरस्कर्ते मानवाच्या मनःक्रांतीच्या दृष्टीनें या यज्ञाकडे त्यांनी पहावें, अशी जी विनंति करतात, तिला फार महत्त्व आहे. पंडित जवाहरलाल यांनी पंचवार्षिक योजनेसंबंधी जे उत्तर दिले तसेंच कांहीं हें उत्तर आहे. या यज्ञांतून निर्माण होणारे आर्थिक प्रश्न कमी महत्वाचे आहेत असा याचा मुळींच अर्थ नाहीं. सांपत्तिक दृष्ट्या पुढे मागें भारताची यानें हानी होणार असेल तर आपणांस त्रिवार विचार केला पाहिजे त्यांत शंकाच नाहीं. पण तितकी हानी यामुळे मुळींच होणार नाहीं हें अनेकांनी दाखवून दिले आहे. हे ठरल्यानंतर मग कांहीं किरकोळ हानि होणार असेल किंवा हानि मोठी असून ती तात्कालिक असेल तर भूदान-यज्ञानें भारतांच्या जीवनांत जी सर्वांगीण आमूलाग्र क्रांति होणार आहे, होत आहे, तिच्याकडे दृष्टि ठेवून त्या हानीकडे दुर्लक्ष करण्यास मुळींच हरकत नाहीं. आपले बांधव दारिद्र्यांत असतांना आपणं