पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९६
भारतीय लोकसत्ता

लवकर सुटेल, म्हणून प्रत्येक राज्यसरकारने आपल्या ग्रामीण विकासाच्या कार्यांत भूदानाचा अंतर्भाव करावा, अशी शिफारस केली आहे. हे आंदोलन नैतिक दृष्ट्या अतिशय थोर आहे. त्याला संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे, असा आपला अभिप्रायहि त्यांनी नमूद करून ठेवला आहे. (पंचवार्षिक योजना प्रकरण १२ व १३).
 सुमारें अडीच वर्षांपूर्वी तेलंगणाच्या भूमीत या भूदान-यज्ञाला प्रारंभ झाला. कम्युनिस्टांनी तेथें घातपात, खून, जाळपोळ, लूट या हिंसेच्या मार्गाने जमिनीची वांटणी करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा रीतीनें त्यांनी ३० हजार एकर जमीन मिळवून तिचें वांटप केले होते. त्या वेळी विनोबांनीं तेलंगणांत पायीं यात्रा केली आणि तेव्हांच भूदानयज्ञाच्या कल्पनेचें त्यांना स्फुरण होऊन त्यांनी ते आंदोलन सुरू केले. तीन वर्षांत जाळपोळ, खून या दहशतीच्या मार्गाने कम्युनिस्टांनीं वर सांगितल्याप्रमाणे ३० हजार एकर जमीन मिळविली, तर अत्यंत शांततेच्या पूर्ण अहिंसेच्या मार्गानें विनोबांनीं अडीच वर्षांत २४ लक्ष एकर जमीन मिळविली आहे. त्यांतील तेरा लक्षांचे एका बिहार प्रांतांतच दान मिळाले आहे. उत्तर प्रदेशांत त्याच्या खालोखाल म्हणजे सुमारें पांच लक्ष एकर मिळाले आहेत. १९५७ पूर्वी पांच कोटी एकरांचे दान मिळवून हिंदुस्थानांतील जमिनीचा प्रश्न कायमचा सोडवून टाकावयाचा असा विनोबाजींचा संकल्प आहे. आणि आतांपर्यंत जे दान मिळाले आहे तेच अद्भुत शक्तीच्या किंवा चमत्काराच्या कक्षेत टाकण्याजोगे असल्यामुळे पुढचा महा संकल्पहि कदाचित् सिद्धीस जाईल अशी आशा वाटू लागते.
 हें आंदोलन लहानमोठया प्रमाणावर आतां भारताच्या सर्व प्रदेशांत सुरू झाले असून त्यामुळे देशांत एक निराळे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. बंगाल, कर्नाटक, म्हैसूर, आसाम, गुजराथ या प्रांतांतून अजून म्हणण्याजोगें दान मिळालेले नाहीं. महाराष्ट्र, सौराष्ट्र, आंध्र, केरळ यांचीहि भागीदारी बेताचीच आहे; पण तेथेहि या लाटा जाऊन पोचल्या आहेत, शंकरराव देव, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, दादा धर्माधिकारी यांसारख्या कार्यकर्त्यांनी या कार्याला वाहून घेतले आहे. जयप्रकाशजी-