पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९५
कृषिपुनर्घटना

आपले मत बदलले पाहिजे असे वाटू लागते, इतक्या शांतपणे केवळ युक्तिवादानें, केवळ विनवणीच्या दोन शब्दांनी एखाद्या देशांत संपत्तीची झालेली विषम वांटणी नष्ट करता येईल, आपल्याजवळचे जमिनीसारखे अमोल धन आपल्या बांधवांना देऊन टाकण्याइतके मानवाचें मत-परिवर्तन असल्या सौम्य साधनानी होईल, यावर कोणाचाहि कधीहि विश्वास बसला नसता; आणि अजूनहि एकादे वेळीं, विश्वास ठेवू नये, हे सारें स्वप्न असण्याचा संभव आहे, असें मनाला क्षणभर वाटतें; पण विनोबाजींनी आपल्या तीन तपांच्या पुण्याईनें तें स्वप्न साकार करून दाखविले आहे. आतां या भूदानाच्या चळवळीला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की, कम्युनिस्ट व तत्समपंथीय सोडले तर भारतांतील सर्व पक्षोपपक्ष तिनें जिंकले आहेत. सत्ताधारी काँग्रेसपक्षाचाहि तिला विरोध नाहीं. वास्तविक पक्षाचे हीन राजकारण त्याप्रकारचे असतें. जनतेचें कल्याण खरें, पण ते आपल्या पक्षाकडून झालें तरच ते राजकीय पक्षांना हवें असते. दुसऱ्या पक्षानें जनतेचें कल्याण केले तर तो पक्ष निवडून येऊन सत्तारूढ होण्याचा संभव निर्माण होतो म्हणून परपक्षानें कल्याणकारी असा कार्यक्रम जरी आरंभला तरी राजकारणांतले पक्ष त्याला विरोध करतात. भारताचे सुदैव असे की, असल्या हीन राजकारणाचा ज्याला सात जन्मांत संपर्क झालेला नाहीं असा थोर पुरुष काँग्रेसच्या नेतृपदीं सध्यां आहे. पंडित जवाहिरलालजींनी मुक्तकंठानें भूदानयज्ञाची स्तुति करून त्याला पाठिंबा देण्याचा काँग्रेसला आदेश दिला आहे. इतकेच नव्हे तर सध्यां सर्वांत जास्त महत्त्वाची हीच चळवळ आहे असाहि अभिप्राय त्यांनी दिला आहे. 'मी भूदानयज्ञाला सर्वात जास्त महत्त्व देतों. हे आंदोलन कोठल्याहि एका पक्षाचें नाहीं. आणि आपल्या पक्षीय संबंधाचा विचार न करता सर्वांनी या कामांत भाग घेतला पाहिजे. हें एक महान् क्रांतिकारी आंदोलन आहे व त्यामुळे देशाचे मोठें हित साधले जात आहे याबद्दल मला यत्किंचितहि शंका नाहीं. आचार्यविनोबांचें आंदोलन म्हणजे भारतांतील मुख्य जो जमिनीचा प्रश्न त्याची उकल करण्याचा एक असाधारण मार्ग आहे यांत शंका नाहीं.' असे त्यांचे उद्गार आहेत. (साधना १२-९-५३) पंचवार्षिक योजनेच्या कर्त्यानींहि भूदान-यज्ञाला मान्यता देऊन कायद्यापेक्षां या मार्गानें जमीन वाटपांचा प्रश्न