पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९४
भारतीय लोकसत्ता

आहेत. नद्यांवर पंप बसवून पाणी खेचीत आहेत. आतां या कार्यात कसलेच व्याघात येत नाहींत असें नाहीं. अनेक व्याघात येत आहेत. कोठें पैसा नाहीं, कोठें आपसांतील कलह आहेत. कोठें काँग्रेसजन मानासाठी अडून बसले आहेत. हे सर्व काँग्रेसचें प्रदर्शन चालू आहे म्हणून कोठें इतर पक्ष नाराज आहेत. पण असे सर्व असूनहि या सर्व अडचणी उल्लंघून सर्वत्र लोक पुढे पाऊल टाकीत आहेत. आणि त्यामुळे या योजना पुष्कळशा यशस्वी होतील अशी आशा निर्माण झाली आहे. (टाइम्स ऑफ इंडिया २६ जानेवारी १९५४) याप्रमाणे खेड्याखेड्यांत सहकारी जीवनाचा मंत्र जाऊन पोचला, या नव्या कार्याविषयींच्या उत्साहामुळे गांवकऱ्यांना आपसांतील कलह, वैमनस्यें, हाडवैरे विसरण्याइतका विवेक साधतां आला, संघटनेचे सामर्थ्य निर्माण होऊन जमीन जास्त फलदायी होऊं लागली, त्याच सामर्थ्याच्या जोरावर गांवांतील गुंडांच्या उपद्व्यापांना आळा बसला आणि अखिल भारताच्या लोकसत्ताकाचे आपण एक घटक आहो, ही जाणीव यापुढे खेड्याखेड्यांत निर्माण झाली तर यांतील प्रत्येक खेडें म्हणजे भारताच्या लोकसत्तेच्या रक्षणार्थ उभा असलेला एक किल्लाच ठरेल आणि मग समृद्धि व सामर्थ्य निर्माण करणे हें जे आपले सध्यांचे ध्येय आहे ते साध्य होईल. पंचवार्षिक योजना म्हणजे प्रत्यक्ष योजना नसून ती एक प्रेरणा आहे, ही योजना सदोष असली तरी पुढील निर्दोष योजनेचा तो पाया आहे, असें जें पंडितजी म्हणतात ते त्यांचे म्हणणेंहि त्यामुळे सार्थ होईल.

भूदान यज्ञ

 योजनाबद्ध सहकारी जीवन हें जसे कृषिपुनर्घटनेस अवश्य आहे त्याचप्रमाणे जमिनीची समवांटणी हीहि अवश्य आहे. भारताच्या पुढे असलेली ही अत्यंत बिकट समस्या सोडविण्याचे कार्य विनोबाजींनीं शिरावर घेतले आहे. त्यांच्या भूदान यज्ञाच्या मार्गानें जमीनदारीचा नाश करून जमिनीचे फेरवांटप करण्याचें कार्य पूर्ण लोकशाही मार्गानें साध्य होईल अशी आशा आतां सर्वांना वाटू लागली आहे. विनोबाजींच्या भूदान- यशाच्या ज्या वार्ता कानीं येत आहेत त्या ऐकून मानवजातीविषयीचे