पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९३
कृषिपुनर्घटना

'सात लाखांतील एकाची कहाणी!' असा तो मथळा आहे. हिंदुस्थांनात सात लाख खेडीं आहेत. त्या सर्वांत सावरगांवाप्रमाणे स्वयंस्फूर्ति निर्माण व्हावी ही आशा त्यांत ध्वनित केली आहे.
 माझ्या मते सरकारनें ज्या अनेक योजना आंखून कार्याला आरंभ केला आहे, त्यांच्या योगानें हा संदेश खेडोपोडीं पोचविण्याचे कार्य होत आहे. हें जें अप्रत्यक्ष कार्य होत आहे, तेच या योजनांचें खरें फल होय. भारताला अमेरिकन तज्ज्ञांचें ने साह्य मिळत आहे त्याच्यासाठी त्या तज्ज्ञांची एक समिति नेमलेली आहे. तिचे प्रमुख क्लिफर्ड विल्सन यांनी सरकारने सुरूं केलेल्या 'कम्युनिटी प्रॉजेक्टस्' योजनेविषयीं जो अभिप्राय दिला आहे, त्याचा हाच भावार्थ आहे. "या योजनांमुळे ग्रामीण जनतेला जी स्वावलंबनाची व स्वयंकर्तृत्वाची प्रेरणा मिळाली आहे ती प्रेरणा म्हणजे त्या योजनांचें एक मोठें फल आहे. सरकारच्या हांकेला जनतेनें ही जी प्रतिसाद दिली ती भारताला अत्यंत अभिमानास्पद आहे. या कम्युनिटी प्रॉजेक्टमुळे, दृढनिश्चय असला की पर्वतहि इलवितां येतात, हा सिद्धान्त नव्यानें एकदां सिद्ध झाला." (कुरुक्षेत्र मासिक– २-१०-१९५३) असे हे पर्वत हलविण्याचे कार्य भारतांत सर्वत्र सुरू झाले आहे असे यासंबंधीची जीं अनेक वृत्ते प्रसिद्ध होत आहेत त्यांवरून दिसून येत आहे. कौन्सिल ऑफ स्टेट्सचे उपाध्यक्ष कृष्णमूर्तिराव यांनी गेल्या पांच महिन्यांत म्हैसूर, कोल्हापूर, कर्जत, भोपाळ, झांशी, रांची, अलिपूर इ. ग्रामविकास केन्द्रांना भेटी दिल्या. इतरत्रहि अनेक ठिकाण ते हिंडून आले. या दौऱ्यांत त्यांना असें दिसून आलें कीं भारतांत एक नवीन उत्थान निर्माण होत आहे. या योजनांविषयीं लोकांत खूपच उत्साह निर्माण झाला आहे. त्यांची प्रारंभीची भीतीची, संशयाची व असहकाराची वृत्ति आतां नाहींशी होऊन ते आत पूर्ण सहकार्य करीत आहेत आणि या योजना यशस्वी करून दाखविण्यासाठीं त्यांच्यांत अहमहमिका लागली आहे. यामुळे हजारों पाटबंधाऱ्यांचीं कामें स्वयंस्फूर्तीने सुरू केली गेली आहेत. शाळा उभारल्या गेल्या आहेत, रस्ते बांधले गेले आहेत. झाडें लावली जात आहेत, खताचे खड्डे, चराचे संडास लोक तयार करीत आहेत. बीबियाणे, खतें जमवून पडीत जमिनी लागवडीस आणीत आहेत. त्यासाठी विहिरी खणीत