पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९२
भारतीय लोकसत्ता

साह्याने रस्ते बांधणे, विहिरींतळीं खोदणें, चरांचे संडास खणणे, शाळा बांधणें अशीं कामें घडवून आणली. या प्रयत्नांत नवसमाजनिर्मिति हेच पथकाचें ध्येय आहे. या कार्याचें शिक्षण देण्यासाठी दरसाल पथक अनेक ठिकाणीं शिबिरें उघडून तेथें विद्यार्थ्यांच्या मनावर या नव्या तत्त्वज्ञानाचे संस्कार करण्याची कोशीस करते. या विद्यार्थ्यांतून पुढील पिढीचे कार्यकर्ते निर्माण झाले, तर कृषिपुनर्घटनेच्या कार्याला त्यांचे फार मोठे साह्य होईल. आज उणीव आहे ती अशा कार्यकर्त्यांचीच आहे. एस्. एम्. जोशी, भाऊसाहेब रानडे, नानासाहेब डेंगळे यांच्या प्रयत्नाने ही उणीव भरून निघेल अशी आशा वाटते.
 आणखी एक उदाहरण देऊन योजनायुगाचें हें स्पष्टीकरण पुरे करतो. ते उदारण म्हणजे सांवरगांवचें. मध्यप्रदेशांतील बुलढाणा जिल्ह्यांत हें गांव आहे. संतोषराव पाटील हे येथले प्रमुख कार्यकर्ते असून बाबासाहेब पाटील, त्र्यंबकराव पाटील, व पुंडलिकराव पाटील हे त्यांचे साह्यकारी आहेत. यांनी आपल्या गांवचा स्वावलंबनानें कायाकल्प करण्याचे ठरविल्याला आज एक तपाच्यावर काळ लोटला आहे. आणि तेवढ्या अवधीत त्यांनी खरोखरच आपल्या गांवची कळा अंतर्बाह्य बदलून टाकली आहे. आजची आपलीं खेडीं म्हणजे हेवेदावे, परस्परविरोधी गट, अरेरावांची गुंडगिरी, दारिद्र्य, अज्ञान, रोगराई आणि वैफल्य यांचें मूर्तिमंत वसतिस्थान, अशी स्थिति आहे. सावरगांव त्याला अपवाद नव्हते. पण या कार्यकर्त्यांनी ही सर्व अवकळा नष्ट करून तेथें नवजीवन निर्माण केले आहे. गांवांत त्यांनीं प्रथम साक्षरतेचे वर्ग सुरु करून अज्ञानाविरुद्ध मोहीम काढली. आरोग्याची आघाडी उघडून गांवांतून रोगराई नष्ट केली. १९४६ सालच्या कॉलऱ्याच्या सांथींत या गांवचा एकहि बळी पडला नाहीं, हे त्या आघाडीच्या यशाचें उत्तम निदर्शक आहे. गांवांत एक अभेद्य संघटना निर्माण करून तिच्या साह्यानें त्यांनी रस्ते बांधून काढले, मंदिरें उभारलीं, गांवांत अनेक ओटे बांधून तेथें झाडें लावून छाया केली, गांवच्या विहिरी बांधून काढल्या आणि विशेष म्हणजे- गांवाला एक वाचनालय करून दिले. ८ ऑगस्ट १९५३च्या साधनेंत रा. विनायक आठल्ये यांनी सावरगांवचें हें वर्णन दिले आहे. तें देतांना त्यांनी लेखाला जो मथळा दिला आहे तो फार उद्बोधक आहे.