पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८९
कृषिपुनर्घटना

दारीवर त्या पार पाडीत आहेत. १९४६ साली काँग्रेसने सत्ता हाती घेतली तेव्हांपासून योजनांचें युग भारतांत सुरू झाले. आणि सरकारनें ज्या योजना आंखल्या त्या तज्ज्ञांच्या मतें अशास्त्रीय असल्या, त्या हिशोबाप्रमाणे चालत नसल्या, अंदाजाबाहेर त्यांत खर्च होत असला, तेथील अधिकाऱ्यांच्या नालायकीमुळे, भाडोत्रीपणामुळे, निर्जीव कारभारामुळे त्या यशस्वी होत नसल्या तरी आपल्या देशांत योजनाबद्ध जीवनाचें त्यांमुळे वातावरण निर्माण होत आहे; युगानुयुगें घोरत पडलेला समाज जागा होऊन या मार्गाने जावयाचें ठरवून, स्वयंस्फूर्तीनें संघटित होऊन, आपल्या आपण योजना आंखून, स्वतःच्या जबाबदारीवर त्या यशस्वी करून दाखवीत आहे; हे पाहिले म्हणजे प्रांतविकासयोजना किंवा वार्षिक योजना मुळींच अयशस्वी झाल्या नाहीत असेच कोणालाहि म्हणावेसे वाटेल. त्यांनीं नव्या युगाला जन्म दिला आहे; खेडोपाडी संघटित, सहकारी जीवनाचे, शेतीच्या विकासाचे, शास्त्रीय कल्पनांचे पडसाद घुमवून नव्या प्रेरणा दिल्या आहेत; आणि त्यांतच या योजनांचें खरें यश आहे. पूर्वीच्या काळीं कांहीं लोकांना हीन धातूचे सोने करण्याचा नाद असे. त्यांचे त्यासाठी नानाप्रकारचे प्रयत्न चालू असत. कापूर, अभ्रक, नवसागर, पारा असल्या अनेक द्रव्यांचा ते उपयोग करून पहात. नाना रसांचे नाना प्रयोग करीत. या त्यांच्या प्रयत्नांतून त्यांना हवी असलेली हीनाचे सोनें करण्याची विद्या त्यांना हस्तगत करता आली नाहीं; पण त्यांच्या त्याच प्रयत्नांतून रसायनशास्त्र निर्माण झाले आणि त्याने प्रत्यक्ष सोन्याचा नसला तरी संपत्तीचा महापूर देशांत निर्माण केला. सरकारनें आंखलेल्या योजनांमुळे त्यांनी मनापुढे ठेवलेली उद्दिष्टें जरी पूर्णपणे सिद्ध होत नसली, तरी सर्व भारतांत जनतेला त्यांनी जी नियोजनाची प्रेरणा दिली आहे, तिच्यामुळे त्या उद्दिष्टापेक्षा जास्त असे बहुमोल ध्येय सिद्ध होत आहे.
 पुढील उदाहरणांवरून या नव्या प्रेरणांची कांहींशी कल्पना येईल. दिल्लीपासून १४ मैलांवर भावलपूर नांवाचे गांव आहे. तेथें पसतीस कुटुंबांनी ४०० एकर पडीत जमीन घेऊन सर्व कारभार सहकारी तत्त्वावर चालविला आहे. जमीनहि त्यांनी समाईक मालकीचीच ठेवली आहे. शेतीचा व
 भा. लो.... १९