पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९०
भारतीय लोकसत्ता

गांवांतला सर्व कारभार तेथे याच पद्धतीने चालला आहे. आज तेथें संपूर्णपणे नवी सृष्टि निर्माण झाली आहे. फरीदाबादचा प्रयोग याहिपेक्षा मोठा आहे. तेथे ५०००० लोकांनी आपले जीवन योजनाबद्ध करण्यांत यश मिळविले आहे. शेतीसाठी २५ सहकारी मंडळे स्थापून त्यांनी उत्कृष्ट समृद्धि निर्माण केली आहे. मालक व मजूर हा भाव त्यांनी तेथें निर्माणच होऊं दिला नाहीं. श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय यांनीं इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियन या नांवाची संस्था काढली आहे. तिच्या मार्फत वरील दोन्ही प्रयोग झालेले आहेत. सरकारने त्यांना प्रथम साह्य तर केले नाहींच; पण तीव्र विरोध केला. कारण सरकारी यंत्रणेंत कांहीं कारणामुळे या योजना बसत नव्हत्या; पण त्या सर्वाला तोंड देऊन लोकांनी सिद्धि वश केली. पेपसू प्रदेशांत पारवाखेडे या गांवीं पश्चिम पाकिस्तानांतून आलेल्या ३३ कुटुंबांनी ५६५ एकर जमीन घेऊन असाच नवा संसार उभा केला आहे. या सर्व नव्या वसाहतींत नव्या आर्थिक जीवनाच्या अनुषंगानें नवें सामाजिक जीवनहि निर्माण होत आहे. या कोणच्याहि वसाहतींत अस्पृश्यता, जातिभेद किंवा तत्सम जुनाट रूढि पाळल्या जात नाहींत. जुगार, दारू या व्यसनांचा त्यांनी नायनाट केला आहे. हुंड्याची चाल रद्द केली आहे. आणखीहि अनेक सामाजिक सुधारणा करून त्यांनी जीवनांत सर्वांगीण क्रान्ति घडविली आहे.
 महाराष्ट्रांत असे नवजीवन उभारले जात असल्याच्या वार्ता हल्लीं नित्य वाचावयास मिळतात. खानदेशांत धुळ्याजवळ मोराणे या गांवी दशरथ पाटील यांनीं या तऱ्हेचा एक उत्कृष्ट प्रयोग केला आहे. दुष्काळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांनी गांवाजवळचा नकाण्याचा कोरडा पडत असलेला तलाव सरकारकडून शेतीसाठी घेतला व त्यांतील पन्नास एकरांची सहकारी पद्धतीनें मशागत करून त्यांत पिके उभी केलीं. जमिनीची साफसफाई, नांगरट, पेरणी सर्व कामे सगळ्या गांवानें समाईकीनें केलीं. ५ रुपयाचा एक असे २०० भाग काढून भांडवलाच्या रूपानें प्रारंभींचा खर्च करण्यांत आला. पिकाची रखवाली सगळा गांव याच पद्धतीने करीत होता; यामुळे चोरीमारीचा, पीक कापले जाण्याचा संभवच नाहींसा झाला. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पांचसहा वर्षांत पिके कापण्याचे,