पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८७
कृषिपुनर्घटना

पराभूत राष्ट्रांच्या कारभारांतच असले हीन प्रकार घडत असतात असें नाहीं. विजयी राष्ट्रांच्या कारभारांतहि सर्व तऱ्हेच्या हीन वृत्तीचे प्रदर्शन झालेले असतें. तुलनेनें पहातां तें कमी असतें एवढेच. पण इतिहासांत त्यांचे विजय तेवढे नोंदले जातात. आणि बाकी सर्वांवर पडदा पडतो. अत्यंत नांवारूपाला आलेल्या अत्यंत यशस्वी म्हणून गाजलेल्या संस्थांच्या इतिहासांतहि हेंच घडत असते. वर सांगितलेल्या दोषांतून मुक्त अशी संस्था, अशी घटना, असें यशस्वी कार्य जगांत एकहि नसेल, नीति व अनीति, धर्म व अधर्म यांचा सामना होऊन जेव्हा जेव्हां धर्माचें पारडें थोडें जड होते तेव्हां यश मिळते आणि अवश्य तेवढ्याहि धर्मवृत्ति जेव्हां निर्माण होत नाहींत तेव्हां अपयश येते. येथे धर्म हा शब्द सार्वजनिक जीवनांतल्या दक्षता, कर्तृत्व, जबाबदारी, सचोटी, दूरदृष्टि, कार्याचा आटोप इ. गुणांचा समुच्चय या अर्थी वापरला आहे. असो. तर तात्पर्याार्थ हा की या धर्माची पुण्याई आपण आपल्या सार्वजनिक जीवनांत किती प्रमाणांत निर्माण करतो यावर आपल्या लोकसत्तेचे भवितव्य अवलंबून आहे, ही खूणगांठ आपण मनाशी बांधली पाहिजे आणि सध्यांच्या एकंदर कारभाराविषयी टीका करतांना त्या रोखानें आपण चाललों, त्यांतून हा फलितार्थ निघाला तरच आपल्याला यश येण्याची आशा बाळगतां येईल. नाहीतर अविवेकी टीका केली, तुलनात्मक दृष्टि ठेविली नाहीं, आणि हे सर्व अपयश सरकारचें, काँग्रेसचें आणि एकंदरींत आपल्याखेरीज बाकी सर्वांचे आहे असेच मानीत राहिलों तर येणार असलेले यश, आपल्याला आपल्या या वृत्तीमुळेहि सोडून जाईल.
 सुदैवानें आपल्या राज्यकर्त्यांना आणि विशेषतः आपले कर्णधार पंडित जवाहिरलाल यांना वस्तुस्थितीविषयी कसलाहि भ्रम नाहीं. मधूनमधून उत्तेजनासाठी आपण पुष्कळच यशस्वी होत आहे, असे ते म्हणत असले तरी काँग्रेसचा कारभार व सरकारी कारभार यांवर त्यांनी इतकी कठोर व भेदक टीका वेळोवेळी केली आहे व अजूनहि ते करीत आहेत कीं, तितकी काँग्रेसच्या शत्रूंनींहि केली नसेल. 'राजकीय पुनर्घटना' या प्रकरणांत याविषयींचे त्यांचे व वल्लभभाई पटेल, राजेन्द्रबाबू यांचे अत्यंत कठोर उद्गार अवतरून दिलेच आहेत. पंचवार्षिक योजना व इतर योजनांच्या बाबतींतहि ते असेच