पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८६
भारतीय लोकसत्ता

बैठकीवरून विचार करतो तसाच आपल्या लोकसत्तेचाहि करण्यास आपण शिकलं पाहिजे.

व्यवहार असाच असतो

 तसा विचार आपण करूं लागलो तर मग सध्यांच्या परिस्थितीतहि बरेच आशेचे किरण आपल्याला दिसू लागतील. आपल्या देशांतील उत्पादन वाढणे, येथें समृद्धि निर्माण होणें हें बऱ्याच अंशी येथील पाटबंधाऱ्यांच्या योजनांवर अवलंबून आहे. त्यांमुळे जमिनीला पाणी मिळेल आणि उद्योगधंद्यांना वीज मिळेल. तशा योजना आपल्या सरकारने पुष्कळच आंखल्या आहेत आणि त्यांतील बऱ्याचशा चालू होऊन कांहीं प्रत्यक्ष फलहि देऊं लागल्या आहेत. भाकरानानगल योजना, दामोदर व्हॅली योजना, हिराकूड योजना, तुंगभद्रा योजना, लोअर भवानी, मयूराक्षी, काक्रापारा, मुचकुंद, कोयना, चंबळा, कोसी, कृष्णा इ. अनेक पाटबंधाऱ्यांच्या योजना आंखलेल्या आहेत व त्यांतील तीन चतुर्थीशांच्या कामाला प्रारंभहि झाला आहे. एवढ्या पुऱ्या झाल्या तर पन्नाससाठ लाख एकर जमीन भिजेल व सगळ्या हिंदुस्थानच्या कारखानदारीला वीज पुरेल. आतां या योजना पुऱ्या तरी होतील कीं नाहीं हीच शंका सध्या सर्वांच्या मनांत येत आहे. ती येणें व त्यामुळे लोकांनी कठोर टीका करणें हें स्वाभाविक व सयुक्तिकहि आहे. पण ती टीका करीत असतांना मनांत हा विचार ठेवावा कीं, नेमलेल्या वेळांत व नेमलेल्या हिशेबांत या पुऱ्या होणार नाहींत इतकाच त्यांचा अर्थ आहे. पांचच्याऐवज पंचवीस वर्षे लागतील. शंभरच्या ऐवजी दोनशे कोटी रुपये खर्च येईल; आणि असे झाल्यामुळे यांतील निम्या योजना कदाचित् तशाच पडून रहातील. पण पुढील पंचवीस वर्षात अंदाधुंदी, बजबजपुरी, लांचलुचपत, हलगर्जीपणा, बेपर्वाई, या सर्वांतून यांतील निम्या योजना जरी यशस्वी झाल्या तरी आपल्या लोकसत्तेचा पाया दृढ होईल व ती यशाच्या मार्गाला लागेल. इतिहासांत जीं जीं महाकार्ये यशस्वी झाली त्यांच्यावरच कालाने टाकलेली आवरणे आपण काढून पाहिली तर त्या यशामागें हे सर्व प्रकार असेच घडत होते असें आपणांस दिसून येईल. मोठमोठ्या लढाया जिंकल्या जातात तेव्हां