पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८५
कृषिपुनर्घटना

धोरणामुळे, किंवा त्यांतील माणसांच्या हीन वृत्तीमुळे येत नसून आपल्या सर्व समाजांतील मूलभूत मानवी मनोधर्मांतले जे दोष, जी वैगुण्यें, जी हीनता, तीच या अपयशाला कारणीभूत झालेली आहे व होत आहे. 'आमच्या हातीं कारभार द्या, आम्ही उत्तम शासन चालवून दाखवतो.' अशा कांहीं क्षुद्र माणसांच्या वल्गना आहेत. पण काँग्रेस पदच्युत झाली तर अमका पक्ष तेथे येऊन आपली लोकसत्ता यशस्वी करून दाखवील अशी कोणाच्याहि मनांत आशा नाहीं. भारतीय जनतेनें हें मनोमन जाणले आहे की, अमुक एक पक्ष, अमकी एक संघटना सत्तारूढ झाली तर या देशांच्या राजकारणाला किंवा अर्थकारणाला निराळे वळण लागेल असे वाटण्याजोगी परिस्थिति भारतांत मुळींच नाहीं. याचा अर्थ हा की, लोकशाहीचा जो श्रेष्ठ धर्म त्याच्या परिपालनासाठी, त्याच्या आचरणासाठी लागणारे जे उच्च गुण, जें महासत्त्व, तेंच आपल्याठायीं आज नाहीं. म्हणून त्याची जोपासना केल्यावांचून ही लोकसत्ता कोणालाहि यशस्वी करून दाखवितां येणार नाहीं हें आपण विसरतां कामा नये.
 याशिवाय सध्यांच्या कालाकडे जरा अलिप्ततेच्या, इतिहासवेत्त्याच्या दृष्टीने पहाण्याचा प्रयत्न करणे हेहि अवश्य आहे. इतिहासांतल्या घडामोडींचा आपण विचार करतो, एखाद्या क्रान्तीविषयी, प्रचंड चळवळीविषयी, महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेविषयी आपण विचार करतो तेव्हां पंचवीस, पन्नास, किंवा शंभर वर्षांचा कालखंड घेऊनच आपण अभ्यास करतो. अनुमानें काढण्यास, निर्णय करण्यास एवढा कालखंड अवश्य आहे, हें त्यावेळी आपणांस सहज पटते. तीच दृष्टि आपल्या लोकसत्तेचा विचार करतांना असली पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्याला अजून दहा वर्षेसुद्धां पुरी झालेलीं नाहींत. एवढया अल्प काळच्या प्रयोगावरून काय ठरणार ! ज्याला चटके बसतात, ज्याला भयंकर घटना घडलेल्या डोळ्यांनी पहाव्या लागतात, ज्याच्या भोवतीं नित्य उद्वेगजनक प्रकार घडत असतात त्याला हा अल्पकाळ फारच मोठा भासावा हें साहजिक आहे. पण म्हणूनच राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करतांना ही दृष्टि वर्ज्य मानली पाहिजे. एकंदर जगांतल्या इतिहासकालीन घडामोडींचा जसा आपण व्यापक