पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८४
भारतीय लोकसत्ता

 आपल्या देशाच्या उत्पादनांत वाढ करून समृद्धि निर्माण करण्यासाठी व तिच्या आधारानें आपली लोकसत्ता स्थिर व सुदृढ करण्यासाठी आपल्या सरकारनें कोणचे उपाय अवलंबिले, कोणच्या योजना आंखल्या व त्यांविषयीं आपल्या देशांतल्या पंडितांनी काय अभिप्राय प्रकट केले ते येथवर सांगून झाले, आतां थोड्या निराळ्या दृष्टीने या सर्वांचा परामर्श घ्यावयाचा आहे.

तुलनात्मक पहाणी

 अगदी आरंभींच्या प्रकरणापासून एक विचार वाचकांच्या मनावर ठसविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. भारतीय लोकसत्तेचें मूल्यमापन करतांना आपण फारच सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्यां या लोकसत्तेचा जो कारभार चालू आहे त्यांतील सांवळागोंधळ, लांचलुचपत, बेजबाबदारी, केविलवाणें अज्ञान, अधम स्वार्थीपणा, उन्मत्तपणा आणि या सर्वामुळे निर्माण झालेले दारिद्र्य, बेकारी, मंदी, विघटना, दौर्बल्य यांकडे पाहिले म्हणजे मन निराश होते आणि भारतीय लोकसत्तेबद्दल आपण वाटेल ते उद्गार काढू लागतो, वाटेल ती टीका करूं लागत. असें होणे साहजिक आहे. पण याचवेळीं विवेकी दृष्टीची, तुलनात्मक अभ्यासाची, व्यापक आलोकाची व अंतर्मुख वृत्तीची फार आवश्यकता आहे. लोकशाही हें ध्येय अत्यंत दुःसाध्य आहे, या प्रकारच्या राज्यपद्धतींत यश मिळविणे हे महाकठिण कर्म आहे, आतांपर्यंतच्या जगाच्या इतिहासांत लोकसत्तेतील यश हा अपवाद आहे, नियम नाहीं, ब्रिटन अमेरिका हीं मोठीं व स्वीडन नार्वे, स्विट्झरलंड हीं लहान राष्ट्रे वगळली तर इतरत्र आपल्यापेक्षां शतपटीनें बेताल परिस्थिति दिसते, हा विचार आपण कधीहि मनाआड होऊं देऊं नये. आपल्या लोकसत्तेचा विचार करतांना नव्यानें उदयास आलेल्या राष्ट्रांचा- रशिया, चीन, जपान, तुर्कस्थान यांचा सतत विचार करावा. इराण, इंडोनेशिया, अरब राष्ट्र व मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू इ. लॅटिन अमेरिकेतील राष्ट्र येथे लोकशाहीचा काय खेळखंडोबा चालला आहे ते मनापुढे आणावे आणि मग भारतीय लोकसत्तेकडे पहावें. दुसराहि एक विचार सारखा ध्यानांत ठेवावा. तो हा की, सध्यांचें अपयश हें कोणा एका पक्षाच्या दोषामुळे, त्या पक्षांतील विशिष्ट तत्त्वज्ञानामुळे,