पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७७
कृषिपुनर्घटना

रहाणाऱ्या कोट्यवधि हिंदी जनतेचें दारिद्र्य नष्ट करण्याचें एक साधन याच दृष्टीनें मी स्वातंत्र्याकडे पहात आलो आहे." उत्तरप्रदेश काँग्रेस- कमिटीपुढे भाषण करतांना त्यांनी भारतांतील जमिनीच्या वाटपाच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित केले होते. 'आपल्यापुढील मुख्य प्रश्न म्हणजे जमिनीचा प्रश्न होय. हा प्रश्न सुटला तर इतर प्रश्न आपोआप सुटतील. तो सुटला नाहीं तर आपला सर्वनाश होईल. काँग्रेसने हा प्रश्न सोडविला तरच तिचें पुनरुज्जीवन होईल. आत्मोद्धाराचें तिच्या हातीं हें फार मोठे साधन आहे.' (भाषण- २७-८-४९) अमेरिकेतील पत्रपंडित नॉर्मन कझिन्स याशीं पंडितजींची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचें स्वरूप आणखी स्पष्ट केले आहे. (२२-४-५१) 'आमचा देश कृषिप्रधान आहे. आम्ही शेतकरी आहों. आणि कृषिपुनर्घटना हे आमचे पहिलें ध्येय आहे. येथली जमीनदारी व सरंजामदारी स्वरूपाची व्यवस्था नष्ट करून तेथें सहकारी व्यवस्था निर्माण करणे हें त्या कृषिनपुर्घटनेचें स्वरूप राहील. या जमीनदारीमुळेच आमची सर्व प्रगति खुंटली आहे. आमच्या प्रगतीच्या मार्गातली ती मोठी घोंड आहे.
 भारताची लोकसत्ता स्थिर व दृढ करण्यास सर्वांच्याच मतें अत्यंत अवश्य अशी जी कृषिपुनर्घटना ती घडविण्याच्या दृष्टीने आपल्या देशांत सध्यां कोणचे प्रयत्न चालू आहेत ते आतां पहावयाचे आहे.
 वर दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरुंच्याच मताप्रमाणे जमीनदारी ही या पुनर्घटनेच्या मार्गातली सर्वात मोठी धोंड आहे. शेतकऱ्याचें जोपर्यंत जमिनीवर स्वामित्त्व नाहीं, आणि केल्या कष्टाचें फल पूर्णपणे आपल्यालाच मिळेल अशी जोपर्यंत त्याला आशा नाहीं, तोपर्यंत त्याच्या हातून शेतीसाठी खरी मेहनत होणे शक्य नाहीं; अंगमेहनत तो करीलहि पण शेतीत सुधारणा करणे, नव्या पद्धतीचा अवलंब करणे, त्यासंबंधी योजना आखून त्या पार पाडण्यासाठी आपले सर्वस्व खर्ची टाकणें हे त्याला शक्य नाहीं, त्याच्याजवळ एवढे कार्य करण्याजोगें मानसिक सामर्थ्य नाहीं, त्याला लागणारे भांडवल नाहीं आणि हें साधण्यासाठी लागणारा उत्साह नाही. जमीन त्याची झाली तर सर्व अडचणी दूर होऊन हळूहळू ही सामर्थ्यें