पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७६
भारतीय लोकसत्ता

दूध मिळते; आणि श्रीकृष्णाच्या या भूमीत शेतकऱ्यांपैकी शे. ७० लोकांना दुधाचें दर्शन घडणेहि कठीण होऊन बसले आहे.

दारिद्र्य आणि व्यक्तित्व

 आपण हें निश्चित ध्यानांत ठेविले पाहिजे कीं ज्याच्या घरांत हक्काचे अन्न व वस्त्र नाहीं त्या मनुष्याचें मन नेहमी हीन, दीन, पंगु असेंच रहाणार. व्यक्तीच्या अहंकाराचे पोषण, त्याच्या 'स्व' चा विकास, त्याच्या व्यक्तिमत्वाचा उत्कर्ष हा लोकशादी समाजरचनेचा आत्मा होय. हें जर खरें असेल तर दारिद्र्यांत या आत्म्याचा पोष कधींहि होणार नाहीं व म्हणून दरिद्री देशांत लोकसत्ता यशस्वी होणे कधींहि शक्य नाहीं हें कोणालाहि सहज पटेल. धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा तीन प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध लोकसत्तेच्या अभिमान्यांना झगडा करावा लागतो. कारण या गुलामगिरीमुळे माणसाचें मन अगदीं पंगु, अगदीं दुबळे झालेलें असते; पण या सर्वोहूनहि दारिद्र्याने येणारी मानसिक पंगुता मनुष्याच्या अहंकाराला व त्यामुळेच त्याच्या कर्तृत्वाला जास्त बाधक असते. आपल्या देशांत शे. ७०/८० लोक अशा विकल मानसिक अवस्थेत आहेत. लोकशाही यशस्वी करण्यासाठी बहुसंख्य लोकांचे कर्तृत्व उदयास येणे अवश्य आहे. तसे झाले तरच हा अवाढव्य कारभार पेलणे शक्य होईल. पण माणसाची अन्नवस्त्राची भ्रांत मिटल्यावांचून त्याच्या कर्तृत्वाचा उदय होत नाहीं. म्हणून तो राष्ट्रीय प्रपंचाची जबाबदारी वहाण्यास मनाने व शरीरानें असमर्थ होतो. तेव्हां आपल्याला आपली लोकसत्ता यशस्वी करावयाची असेल तर प्रथम आपण या दारिद्र्यांतून मुक्तता करून घेतली पाहिजे. १९५० साली सीलोनमध्यें भाषण करतांना पंडितजींनी हाच भावार्थ स्पष्ट करून सांगितला आहे. ते म्हणाले, "हिंदुस्थानापुढे आज मुख्य समस्या आहे ती म्हणजे जनतेची आर्थिक स्थिति कशी सुधारावी ही होय. लोकांना राजकीय स्वातंत्र्य न देणारी लोकसत्ता जितकी अयशस्वी तितकीच दारिद्र्य नष्ट न करणारी लोकसत्ताहि अयशस्वी होय असें मी समजतों. राजकीय स्वातंत्र्य ही महनीय गोष्ट आहे हें खरेंच आहे; पण या स्वातंत्र्याच्या अभ्यंतरांत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य समाविष्ट झालेले आहे. खेड्यांत