पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७५
कृषिपुनर्घटना

पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा जमिनीवर केवळ गुजराण करावयाची तर माणशी ५ एकर जमीन हवी. हिंदुस्थानांत पांच एकराहून कमी जमीन असणाऱ्यांचे प्रमाण शे. ७० ते ८० इतके आहे. वर सांगितल्याप्रमाणें ८ कोटी लोकांना मुळींच नमीन नाहीं आणि १४/१५ कोटी लोकांना निर्वाहापुरतीसुद्धां नाहीं. म्हणजे इतके लोक आज अन्न-वस्त्राला महाग आहेत. कांहीं विशिष्ट प्रदेशाची पहाणी करून जे आंकडे तज्ज्ञांच्या हाती आले ते पाहिल्यावर वरील कल्पना आणखी स्पष्ट होईल. बिहारमधील चौकशी समितीनें आपल्या अहवालांत असे सांगितले आहे की, शेतकऱ्याच्या कुटुंबाचा निर्वाहखर्च वर्षाला ६१५ रु. आहे. त्यांतील अन्न खर्चच ५२० रु. येतो. आणि बिहारमधील शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४४४ रु. आहे. सर्वोदय समितीने रत्नागिरी जिल्ह्याची पहाणी केली. तीवरून असे ध्यानांत आले की शें. ८० शेतकरी कुटुंबांना प्रत्येक फक्त ३ एकर जमीन आहे. शे. ५९ कुटुंबे कर्जबाजारी आहेत. शें. ६६ कुटुंबांजवळ गाय किंवा म्हैस नाहीं आणि शे. २३ कुटुंबांजवळ तर शेतीला अवश्य तो बैलहि नाहीं.
 इतर देशांशी तुलना केली तर आपले हे दारिद्र्य किती भयंकर आहे याची जास्त चांगली कल्पना येईल. प्रत्येक जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याकडे सरासरी दोन ते तीन एकर जमीन आहे. अमेरिकेत हें प्रमाण दर माणशी १४८ एकर आहे. डेन्मार्कमध्ये ४०, स्वीडनमध्ये २५ आणि जमीन जेथे अगदी कमी त्या ब्रिटनमध्ये सुद्धां हे प्रमाण दर शेतकऱ्यास २० एकर असे आहे. वरील देशांत शेती शास्त्रीय पद्धतीने होत असल्यामुळे तेथें दर एकरी उत्पन्न अनेक पटीने जास्त असतें ही गोष्ट पुन्हां निराळीच. यामुळे आपल्या आहारांतील सत्त्वांशाचें प्रमाण काय असेल याची सहज कल्पना येईल. आपल्याकडे आहारांत प्रोटीन्सचे प्रमाण ८.७ इतकेच आहे, तर अमेरिकेत ते ६१.४ व स्वीडनमध्ये ६२.६ आहे. आयर्लंड देश आपल्यासारखाच गरीब आहे असे म्हणतात; तेथेहि हे प्रमाण ४६.७ आहे. अमेरिकेत दर माणशी दरसाल ११० शेर दूध मिळते. डेन्मार्कमर्थ्ये १६४ शेर व स्वीडनमध्ये सरासरीने २६३ शेर