पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७०
भारतीय लोकसत्ता

त्याच्या हातीं राज्यसूत्रें देणेच आपले कर्तव्य ठरलें असतें. पण दुर्दैवानें तसा एकहि पक्ष नाहीं. अशा स्थितीत मोठ्या प्रकाशसंपन्न अशा विद्युद्दीपाच्या अभावीं जी कोणची लहानशी पणती आपल्याजवळ आहे तिच्या दोन्ही बाजूला हात धरून तिच्या मंद ज्योतीचा जितका संभाळ करता येईल तितका करणे हेच आपले कर्तव्य आहे, हा विचार शांतपणानें मनन केल्यास पटू शकेल असे वाटते. त्या ज्योतीला काजळी आलेली पाहून ती मालवून टाकावी असा विचार संतापाच्या भरांत येणे साहजिक आहे आणि अनेकांनी तो बोलून दाखविलाहि आहे; पण शुद्ध आततायीपणा होईल. लोकशाहीला अवश्य असणाऱ्या विवेकाचें तें लक्षण ठरणार नाहीं. कारण आज या ज्योतीचा संभाळ केला तर भविष्यकाळी केव्हांतरी विद्युद्दीप प्राप्त होण्याचा संभव आहे. पण ही पणती आज मालवून टाकली तर येथे सर्वत्र अराजकाचा अंधार पसरून त्यांत वाटचाल करतांना आपण कोणच्या कड्यावरून कोसळून पडूं, हे सांगणे फार कठीण आहे.
 अत्यंत सुदैवाची गोष्ट अशी की, हे तत्त्व मनोमन जाणूनच भारतीय जनतेने मागल्या निवडणुकांत मतदान केले असे दिसतें. काँग्रेसची पुण्याई लुप्त होते असे दिसत होते. आणि मनाला फारच निराशा वाटत होती. अशा वेळी ही दुसरीच एक पुण्याई या भूमीच्या संरक्षणासाठी उभी राहिली असे दिसतें. बहुसंख्यांचा एक पक्ष या देशांत काय वाटेल तें झाले तरी तगविलाच पाहिजे, असा निश्चय करून तो अमलांत आणण्याइतके सामुदायिक चिंतन व इतकी राजकीय प्रबुद्धता या भूमीतील अत्यंत मागासलेल्या समाजांत निर्माण झाली असेल, असे कोणाच्या स्वप्नांतहि आले नव्हतें. पण गेल्या शतकांतील थोर पूर्वसूरींचें कार्य, टिळक, महात्माजी यांचा मनापुढील आदर्श, पंडितजी, राजेन्द्रबाबू, सरदारजी यांची शिकवण यांचा परिपाक होऊन म्हणा किंवा कोणच्याहि दुसऱ्या कारणाने म्हणा, भारतीय जनतेनें पुष्कळशा प्रांतांत काँग्रेसला बहुमताचा पाठिंबा देऊन या देशावरचा एक घोर अनर्थ टाळला आहे. कांहीं प्रांतांत काँग्रेस सत्ताच्युत झाली हेहि एक प्रकारें हितावह झाले असे वाटते. लोकसत्ताक शासन हे सत्ता चालविण्याइतकें बलसंपन्न असावें, पण जनतेला उपमर्दून टाकण्याइतकें बल त्याच्या ठाय संचित होता कामा नये, असा लोकसत्ताक शासनशास्त्रांतील