पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७१
राजकीय पुनर्घटना

एक सिद्धांत आहे. जनतेनें काँग्रेसला याचीहि जाणीव दिली हे मोठे सुलक्षण आहे असे वाटते. काँग्रेसला आपला कौल देतांना मद्रास, त्रावणकोर, कोचीन, हैद्राबाद या प्रांतांत जनतेनें आपले मनोगत स्पष्टपणे प्रगट केले आहे. जो लोकसेवा करील त्यालाच मी सत्ताधिष्ठित करीन, असा निर्णायक जबाब तिने दिला आहे. यापुढे केवळ पूर्वपुण्याईवर तुम्हांला जगतां येणार नाहीं, असे पंडितजींच्याप्रमाणेच जनतेनेहि काँग्रेजनांना स्पष्टपणे बजाविलें आहे. आणि सत्ताधारी मदांध होऊन स्वार्थपरायण होतील तर त्यांना पदच्युत करण्याचे म्हणजे देशाच्या निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपल्या अंगी आहे, हे तिने निर्विवाद रीतीने प्रत्ययास आणून दिले आहे.
 या अकल्पितपणे उदयास आलेल्या महाशक्तीचा भारतीय तरुणांनी आपल्या राष्ट्राच्या राजकीय पुनर्घटनेच्या दृष्टीने जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दोनचार राज्यांचे अपवाद वजा केले तर, जनतेने भारतांत काँग्रेसला पुन्हां सत्ताधिष्ठित केलें आहे. अशा प्रसंगी, ही शंभर वर्षांच्या तपश्चर्येने निर्माण झालेली पुण्याई नष्ट होऊं द्यावयाची नसेल तर, येथील तरुणांनी पंडितजींच्या हांकेला साद देऊन काँग्रेसमध्ये शिरावें, या दोन चार वर्षात काँग्रेसचा जो अधःपात झाला त्यावरून, तिचें हेंच मूळरूप आहे, असे न मानतां, ही तिची विकृति आहे आणि तिची प्रकृति त्याग, लोकसेवा, ध्येयनिष्ठा यांनींच घडली आहे, हें त्यांनीं ध्यानीं घ्यावें, आणि देशांत जी नवशक्ति निर्माण होत आहे तिच्या साह्यानें लोकसेवा करीत करीत आपल्या च्यारित्र्याच्या बळानें एका पिढीच्या कालावधींत या विराट संस्थेचे संपूर्ण शुद्धीकरण करून तिचे महासामर्थ्य तिला पुनः प्राप्त करून देण्याची महत्त्वाकांक्षा धरावी. मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने आपला देश अत्यंत गरीब आहे. अशा स्थितींत, शंभर वर्षाच्या दीर्घ प्रयत्नानें निर्माण झालेला पुण्यौघ तसाच डावलून दुसरी पुण्याई निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे आपणांस परवडणार नाही. दोन कर्तृत्वशाली संघटना पोसण्याइतके मानवी कर्तृत्वाचें सामर्थ्य या भूमींत निर्माण होण्यास अजून पुष्कळ कालावधि लागेल. तोपर्यंत आधींच निर्माण झालेल्या या जलौघाला अनेक ठिकाणी निर्माण होत असलेल्या जनशक्तीच्या प्रवाहाची जोड देऊन परिपूरित करून टाकणें हाच एक उन्नतीचा मार्ग होय.