पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६९
राजकीय पुनर्घटना

यांना कंटाळून ज्यांनी काँग्रेस सोडली त्यांना काँग्रेसविरोधी आघाडी उभारण्यांत किती यश आले हें महशूर आहे. वास्तविक ध्येयनिष्ठा, उच्च नीति, महात्माजींचें सेवाव्रत या उदात्त घोषणा करीत हे लोक बाहेर पडले होते. त्यांना तर अखिल भारतव्यापी एकसंघ संघटना करण्यास कांहींच अडचणी यावयास नको होत्या. कारण त्यांची प्रेरणा अत्यंत उदात्त होती. पण प्रत्यक्षांत दृश्य असें दिसले की, त्यांच्यांत विघटनावृत्ति सर्वांत जास्त आहे. याचा अर्थ असा की तेहि स्वार्थ, सत्ताभिलाष, क्षुद्रवृत्ति यांतून वर निघू शकत नाहींत. काँग्रेसेतर पक्षांची ही स्थिति पाहिली म्हणजे, विघटना हा केवळ काँग्रेसचाच रोग नसून आपला सर्व समाजच त्या दुर्धर रोगाने ग्रस्त झालेला आहे, हे ध्यानांत येईल.

काँग्रेसमध्ये शिरावें

 स्वार्थ, क्षुद्रवृत्ति, अनीति ही व्याधि केवळ काँग्रेसचीच आहे असे नसून आपण सर्वच तिच्या आधीन आहोत, हे जर भारतीय नागरिकांच्या ध्यानीं आलें, तर त्यांना पुढील विचार स्वीकारण्यास फारशी अडचण पडणार नाही असे वाटते. लोकसत्ताक राज्यपद्धतीचे पहिले तत्त्व असें कीं, त्या पद्धतींत कोणचा तरी एक पक्ष निर्विवाद बहुमताच्या बलानें संपन्न असला पाहिजे. असे असल्यावांचून राज्ययंत्रच चालू शकणार नाही आणि राज्ययंत्र दुबळे झालें, की नागरिकांवर कोणचे अनर्थ कोसळतात तें आतां नव्याने सांगण्याची जरूर आहे असें नाहीं. तेव्हां, लोकसत्ताक पद्धतीचे हे पहिले तत्त्व लक्षांत ठेवून, भारतीय जनतेनें सध्यांच्या काळांत काँग्रेस या संघटनेलाच जास्तीत जास्त पाठिंबा देणे, यावांचून गत्यंतर नाहीं. काँगेसजनांची अधोगामी वृत्ति वर वर्णन करून पुन्हां त्या संघटनेलाच पाठिंबा द्यावा असे मत मांडणें हें अनेकांना अत्यंत विपरीत भासेल. पण जगांतील व्यवहारांत उतरल्यावर तुलनात्मक व तारतम्याच्या दृष्टीने पाहूनच निर्णय करावा लागतो. आपली आकांक्षा कितीहि मोठी असली तरी वस्तुस्थितीकडे पाहूनच व्यवहारांत पाऊल टाकावे लागते हे आपण विसरता कामा नये. विघटनेच्या रोगानें आपल्या सर्व समाजाला व्यापले नसतें, काँग्रेस नीतिभ्रष्ट झाली असतांना इतर कोठला तरी पक्ष निःस्वार्थी, सेवातत्पर व अभंग असा असता, तर