पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६८
भारतीय लोकसत्ता

 मनाची तशी सिद्धता त्यांनी करतांच त्यांच्या पहिली गोष्ट ही ध्यानी येईल की, काँग्रेसला विघटनेची ही जी व्याधि, हा जो रोग जडला आहे, तो केवळ काँग्रेसचा रोग नसून आपल्या अखिल समाजाचा रोग आहे. मार्क्सवादी प्रेरणेने या देशांत आज तीस वर्षे कार्य चालू आहे. त्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या लोकांचे किती पक्ष व उपपक्ष झाले आहेत, त्याचा जनतेने एकदां विचार करावा; म्हणजे आहे या संघटनांत जास्तीत जास्त दृढ अशी काँग्रेस हीच संघटना आहे, हे तिच्या ध्यानांत येईल. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट, रॉयिस्ट, बहुजनसमाजवादी, नवजीवनवादी असे मार्क्सप्रेरित लोकांचे अनेक पक्ष आहेत. आणि त्या प्रत्येकांत पुन्हां अनेक गट आहेत. यांनी निर्माण केलेल्या कामगार संघटनांच्या अशाच चिरफळ्या चालू आहेत. मार्क्सच्या मतें सर्वांत पुरोगामी असलेली ही शक्ति कधींच संघटित होऊं शकली नाहीं; इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत सहभागी होण्याइतकी राजकीय प्रबुद्धताहि या शक्तीला कधी प्राप्त झाली नाही. गेल्या निवडणुकांत या पक्षांनी, काँग्रेस भांडवलवाल्यांच्या आहारी गेली असा प्रचार करीत असतांना स्वतः भांडवलवाल्यांशी कशी लगट केली हि भारताच्या नागरिकांनी ध्यानीं घ्यावें. भाई डांगे यांनी, आम्ही भांडवलाचे राष्ट्रीयीकरण करणार नाहीं, अशी घोषणाच करून टाकली. बहुजनसमाजवादी लोकांनी, व्यापारी हा कष्टकरी वर्ग आहे, असा निर्वाळा दिला व दोन लाखापर्यंत धन असलेल्या श्रीमंतांना गरीब जनतेंत सामील करून टाकले. काँग्रेसजन सत्तारूढ झाल्यावर तरी धनवश झाले. इतर पक्षांनी आधींच आपली शरणागति जाहीर करून टाकली आहे. हिंदुत्वाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या लोकांची स्थिति कांही निराळी नाहीं. त्यांनाहि अखिल भारतांत एक आघाडी निर्माण करता आली नाहीं. हिंदुसभा, रामराज्य- परिषद्, जनसंघ अशा त्यांच्या चिरफळ्या झालेल्या आहेतच. जमीनदार- भांडवलदार यांच्याविषयीं त्यांची वृत्ति काय आहे हे करपात्री महाराजांच्या भाषणावरून सहज कळून येईल. त्यांचें धन त्यांना पूर्वजन्मींच्या पुण्याईमुळे मिळालेले असून ते जप्त करणे हें पाप आहे, असें हे महाराज भाषणांतून सांगतात ! हें दोन गटांचें वृत्त झाले. तिसरा गट काँग्रेस सोडून जाणाऱ्या समाजवाद्यांचा व तत्सम इतरांचा. काँग्रेसमधील स्वार्थ, अनीति, क्षुद्रवृत्ति,